धक्कादायक! मुंबईत मोठा अधिकारी पण गोड आवाजाच्या जाळ्यात अडकला अन् भयंकर घडलं…

पुणे : एका उच्चपदस्थ शासकीय अधिकाऱ्यासोबत एक महिलेनं धक्कादायक कांड केलं. महिलेनं अधिकाऱ्याला तब्बल ४२ लाख ८७ हजार रुपयांना गंडवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

मुंबईतील एका ४३ वर्षीय जीएसटी अधिकाऱ्याला नागपूरच्या महिलेनं आपल्या मोहजालात अडकवून हे ‘कांड’ केलं. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी दोन महिलांसह तिघांविरुद्ध खंडणी आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २०२३ मध्ये या अधिकाऱ्याची ओळख मॅट्रिमोनिअल साईटवर नागपूरमधील एका महिलेशी झाली. सुरुवातीला गोड बोलून विवाहाचे आमिष दाखवत महिलेने अधिकाऱ्याचा विश्वास संपादन केला. त्यानंतर घरगुती आणि वैयक्तिक कारणांचे निमित्त साधून तिने पैसे मागण्यास सुरुवात केली.

अधिकाऱ्याने आतापर्यंत वेळोवेळी एकूण ४२ लाख ८७ हजार रुपये दिले. जेव्हा अधिकाऱ्याला संशय आला आणि त्यांनी पैशांचा जाब विचारला, तेव्हा या महिलेने आपल्या साथीदारांसह मिळून त्यांना धमकावण्यास सुरुवात केली.

धमकी देऊन पुन्हा पैशाची मागणी…
बलात्काराची खोटी फिर्याद देऊन तुला आयुष्यभर तुरुंगात सडवू, अशी धमकी देऊन आरोपींनी अधिकाऱ्याकडे पुन्हा ७ लाख रुपयांची खंडणी मागितली. या सततच्या मानसिक त्रासाला आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून अखेर अधिकाऱ्याने पुण्याच्या भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात धाव घेतली.