घायवळ टोळीतील फरार गुंड अखेर पोलिसांच्या जाळ्यात; बार्शीतून केली अटक…

पुणे: कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या टोळीतील चार महिन्यापासून फरार असलेला आणि दोन मोका गुन्ह्यामध्ये हवा असलेला आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत त्याला सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथून अटक केली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, अमोल दत्तात्रय लाखे( वय २७ वर्षे, रा. ईटखेडा, छत्रपती संभाजीनगर) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. लाखे याच्यावर शाळेच्या पुरवठादार महिलेला धमकावून खंडणी उकळल्याचा गंभीर आरोप आहे.तो बार्शी येथे लपून बसला होता पोलिसांच्या पथकाने सापळा रचून त्याला अटक केली. चौकशीत ताब्यात घेतल्यानंतर त्याने अनेक गुन्ह्याचे कबुली देखील दिली आहे.
कोथरूड गोळीबार प्रकरणानंतर पुणे पोलिसांनी टोळीविरोधात मकोका अंतर्गत कडक कारवाई करण्यास सुरुवात केली असून फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक देखील कार्यरत केली आहेत.दरम्यान, या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि टोळीप्रमुख नीलेश घायवळ अद्याप फरार आहे. तो सध्या ब्रिटनमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.

खंडणी प्रकरणात घायवळ टोळीविरुद्ध वारजे पोलिसांनी ‘मकोका’ कायद्यान्वये कारवाई केली. या प्रकरणात अमोल लाखे याच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल केल्यानंतर तो पसार झाला होता. लाखे हा बार्शी परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षकास मिळाली. त्यानंतर त्याला सापळा लावून ताब्यात घेण्यात आले.