सूनच निघाली खतरनाक किलर!सासूचा काटा काढण्यासाठी पाण्यात विष मिसळलं अन् नवराच गमावला…

पंढरपूर: अनैतिक संबंधात अडथळा ठरलेल्या सासूला मारण्यासाठी सुनेने प्रियकराच्या मदतीने विष देण्याचा कट रचला असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मात्र घडला अनर्थच.. कारण,सासूला मारण्यासाठी सूनेनं पाण्यामध्ये विषारी औषध टाकून पाजण्याचा प्रयत्न केला. पण, सूनेच्या नवऱ्याने पाणी प्यायल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, समाधान लोहार असं मृत झालेल्या पतीचे नाव आहे. मयताची पत्नी सारिका लोहार आणि गावातील शेखर चंदनशिवे यांच्यामध्ये अनैतिक प्रेम संबंध होते.याची कुणकुण तिच्या सासूला लागली असल्याने त्या दोघींमध्ये वारंवार वाद व्हायचे. अखेर या प्रेम संबंधाला अडसर ठरणाऱ्या सासूचा काटा काढण्यासाठी सारिकाने मोठा डाव रचला. पाण्यात विष टाकून तिला मारण्याचा कट रचला मात्र ते पाणी तिचा पतीच प्यायला.
दरम्यान पाणी प्यायल्यानंतर काही तासांनी समाधान यांना उलट्यांचा त्रास सुरू झाला. अचानक तब्येत खालावली. रात्रीच समाधान यांना रुग्णालयात दाखल केलं. जवळपास 6दिवस समाधान यांच्यावर उपचार सुरू होते. पण, अखेरीस उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
पोलिसांनी जेव्हा या प्रकरणाचा तपास सुरू केला तेव्हा सगळ्या घटना समोर आल्या.

पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला असता सारिका आणि शेखर यांचा डाव उलगडला. पोलिसांनी सून सारिका लोहार आणि तिचा प्रियकर शेखर संताराम चंदनशिवे या दोघांना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी खाक्या दाखवातच दोघांनी विषारी प्रयोग केल्याचं कबुल केलं. दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.