ज्येष्ठ नेते शरद पवार हॉस्पिटलमध्ये दाखल होताच सुप्रिया सुळेंचे व्हाट्सअप स्टेटस, दिली महत्वाची माहिती..

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पुन्हा एकदा पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे. पुढील दोन दिवस त्यांना रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे.सध्या त्यांच्यावर रुबी हॉलमध्ये उपचार सुरू आहेत. यादरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.

लेक सुप्रिया सुळे यांनी व्हाटसअप स्टेट्समध्ये म्हटले की, आम्ही बाबांना पुढील चाचण्या आणि हायड्रेशनसाठी पुण्यातील रुबी हॉलमध्ये दाखल करत आहोत.सर्व डॉक्टर आणि आरोग्यसेवक कर्मचाऱ्यांचे आभार असं त्यांनी म्हटले आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर संपूर्ण पवार कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. त्यांच्या निधनांनंतर शरद पवार खचल्याचे सांगितले जाते. काही दिवसांपूर्वीच त्यांना रुबी हॉस्पिटलमध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते. काही दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते, त्यानंतर त्यांना घरी पाठवण्यात आले. आता पुन्हा एकदा शरद पवार यांना रुबी हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आले आहे.

दरम्यान शरद पवार यांच्या शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्याने त्यांना अशक्तपणा जाणवत आहे. त्यामुळे आता त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.