बारावीचे दोन पेपर फुटले! नागपुरात परीक्षेच्या तासाभरापूर्वीच प्रश्नपत्रिका व्हाट्सअँपवर व्हायरल, गुन्हा दाखल..

नागपूर : राज्यभर सुरू असलेल्या बारावीच्या परीक्षेदरम्यान आता विज्ञान शाखेचे दोन विषयाचे पेपर फुटल्याचा धक्कादायक प्रकार नागपुरात उघडकीस आला आहे, याप्रकरणी नागपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून एका विद्यार्थिंनीचा स्मार्टफोन जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात आणखी कोण सहभागी आहे? याचा पोलिस कसून तपास करीत आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरातील सेंट उर्सुला हायस्कूलच्या परीक्षा केंद्रावर विज्ञान शाखेचा पेपर फुटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एका शिक्षिकेच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला. एक विद्यार्थिनी वारंवार प्रसाधनगृहात जात होती त्यामुळे शिक्षिकेला त्या विद्यार्थिनीवर संशय आला. तिची शिक्षिकेच्या माध्यमातून झडती घेण्यात आली असता तिच्याकडून एक स्मार्टफोन जप्त करण्यात आला होता. मोबाईल फोन चेक केला असता एका व्हाट्सअप ग्रुप वर परीक्षा सुरू होण्यापूर्वीच पेपर आलेला होता. तसेच त्या प्रश्नांची उत्तर देखील असल्याच समोर आलं.
विद्यार्थ्यांचा मोबाईल तपासल्यानंतर विज्ञान शाखेचे फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा पेपर परीक्षेच्या तासाभरापूर्वीच व्हाट्सअप वर आल्याची माहिती समोर आली. संबंधित विद्यार्थिनींनी तिच्या मैत्रिणीचे देखील नाव सांगितलं.दोघींचीही चौकशी केली असता खाजगी शिकवणी वर्गातील एका शिक्षकांनी पैसे घेऊन पेपर फोडल्याची माहिती मिळाली.केंद्रप्रमुखांनी सदर पोलिसांना माहिती दिल्यावर पोलिसांनी तपास करून गुन्हा दाखल केला आहे.

विद्यार्थिनीने दिलेल्या माहितीवरून आणि व्हाट्सअप ग्रुप मधील माहितीवरून पोलिसांनी पेपर फोडणाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे.हा पेपर आत्तापर्यंत किती जणापर्यंत पोहोचला तसेच या रॅकेटमध्ये किती जणांचा सहभाग आहे याचा पोलीस तपास करत आहेत.