भिगवण प्रेम प्रकरणावरून दौंडचे आमदार राहुल कुल अडचणीत, तरुणीच्या आईचे धक्कादायक आरोप…

दौंड : भिगवण येथे दिवसाढवळ्या झालेल्या तरुणीच्या कथित अपहरण प्रकरणाने संपूर्ण पुणे जिल्हा हादरला होता. आता या प्रकरणात दौंडचे भाजप आमदार राहुल कुल यांचे नाव चर्चेत आले आहे. कारण या प्रकरणातील तरुणीच्या आईसह इतर नातेवाईकांनी आमदार राहुल कुल यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

आरोपींना राहुल कुल हे मदत करत असून आरोपीच्या कुटुंबातील लोकांनी आपल्या मोबाईलवर राहुल कुल हे आमच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे स्टेटस ठेवले आहे, असा आरोप तरुणीच्या आईने केला आहे.
आमदार राहुल कुल हे आरोपींना मदत करत आहेत. मी पण तुमच्याच तालुक्यातली आहे. पण मला भेटायला यावं, असं राहुल कुल यांना वाटलं नाही. माझी मुलगी परत यावी यासाठी आता इंदापूरचे आमदार दत्तामामा भरणे यांनी मला मदत करावी, असं भिगवणमधील तरुणीच्या आईने म्हटलं आहे.

भिगवण येथील तरुणीच्या आईने आपल्या मुलीचं अपहरण झाल्याची तक्रार दिल्यानंतर सदर तरुणीचा एक व्हिडिओ समोर आला होता. मी माझ्या मर्जीने जहीर शेख याच्यासोबत निघून आल्याचं तिने या व्हिडिओतून सांगितलं होतं.
पण तरुण-तरुणी फरार असताना असे व्हिडिओ पोलिसांपर्यंत आणि त्यांच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचवण्याची आरोपींची हिंमत होते, याचा अर्थ या आरोपींच्या मागे कोणतीतरी राजकीय ताकद उभी असल्याचा आरोप भाजपचेच आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला होता. आरोपीचा तरुणाचा नातेवाईक असलेल्या अजहर शेख याने आज राहुल कुल यांचा फोटो स्टेटसवर ठेवून ‘सदैव एकनिष्ठ’ असा मजकूर त्यावर लिहिला होता.
या पार्श्वभूमीवर गोपीचंद पडळकर यांनी आज सकाळी सांगली इथं बोलताना या आरोपींना इतकी मस्ती कुठून येते, असं म्हणत थेट अजहर शेख याचे व्हॉट्सॲप स्टेटस मीडियासमोर दाखवत नाव न घेता आमदार राहुल कुल यांच्यावर निशाणा साधला. त्यानंतर आता तरुणीच्या आईनेही आमदार राहुल कुल यांचे नाव घेतल्याने ते वादात सापडले आहेत.