भिगवण अपहरण प्रकरणातील तरुणीच्या आईचा टोकाचा इशारा ; ‘आमची मुलगी परत मिळाली नाही तर आत्महत्या….;

पुणे : पुणे जिल्ह्यातील भिगवण येथील तरुणीच्या अपहरण प्रकरणाला आता धक्कादायक वळण लागल आहे. संबंधित तरुणीने स्वैच्छेने आपल्या प्रेमाची कबुली दिल्यानंतर आता तरुणीच्या कुटुंबीयांनी गंभीर इशारा दिला आहे. जर आमची मुलगी आम्हाला परत मिळाली नाही,तर आम्ही इथेच आत्महत्या करू असं टोकाचा इशारा तरुणीच्या आईने दिला आहे.

या सर्व प्रकरणानंतर तरुणीच्या आईची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्या म्हणाल्या, गेल्या बारा वर्षांपासून आमची मुलगी मानसिक दबावाखाली होती. तिला वडील नाहीत, लहान भाऊ आहे. वडिलांच्या निधनानंतर तिच्यावर कोणतीही वाईट नजर पडू नये म्हणून आम्ही सातत्याने प्रयत्न केले. मात्र काही व्यक्तींकडून तिच्यावर मानसिक दबाव आणण्यात आला. तिच्या वडिलांच्या निधनानंतर मोठ्या कष्टाने आम्ही तिला वाढवलं.. मात्र आता ती आमच्याकडे बघतही नाही. जर आमची मुलगी आम्हाला परत मिळाली नाही, तर आम्ही इथेच आत्महत्या करू, असा इशारा तरुणीच्या आईने दिला आहे.
दरम्यान संबंधित तरुणी काल मध्यरात्री पोलीस ठाण्यात हजर झाल्यानंतर तिने माझी आई आणि माझ्या भावाने केलेली तक्रार खोटी असून त्यांच्या डोळ्यात मिरचीपूड टाकण्यात आली नव्हती. शिवाय त्यांच्यावर काठीने हल्ला देखील करण्यात आला नाही, असा खुलासा संबंधित तरुणीने केला आहे.

ज्या तरुणावर तिच्या अपहरणाचा आरोप आहे, तो तरुण मागील एक वर्षापासून तिच्या संपर्कात होता. दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. दोघांना एकमेकांशी लग्न करायचं होतं, असं त्या तरुणीने म्हटलं आहे.तरीही घरच्यांनी तिच्या इच्छेविरोधात हा विवाह ठरवला होता. यामुळेच तरुणीने पळून जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता संबंधित तरुणीच्या कुटुंबीयांकडून टोकाची भूमिका घेण्यात आली आहे.