‘कोणीही दोन्ही राष्ट्रवादींच्या…’, सुनेत्रा पवारांच्या आमदारांना विलीनीकरणासंदर्भात महत्त्वाचा सुचना

पुणे : महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांना अधिक जोर आला होता. निधनानंतर पहिल्यांदाच पक्षाची साप्ताहिक बैठक पार पडली. या बैठकीचं नेतृत्व सुनेत्रा पवारांनी केलं. या बैठकीमध्ये विलीनीकरणासंदर्भात आमदारांना महत्वाच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

या बैठकीत सुनेत्रा पवार म्हणाल्या,कोणीही दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाच्या चर्चांवर प्रसारमाध्यमांशी बोलू नये. विलीनीकरणाचा मुद्दा काही नेते मंडळींनी उपस्थित केला होता. मात्र विलीनीकरणावर आता चर्चा न करण्याच्या नेत्यांच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे विलिनीकरणाच्या चर्चांना आता तूर्तास पूर्णविराम मिळणार आहे.
दरम्यान या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या निवडीची तारीख निश्चित करण्यात आली आहे. 26 फेब्रुवारीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीची कार्यकारिणीची बैठक पार पडणार असल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. या बैठकीत सुनेत्रा पवार यांनाच राष्ट्रीय अध्यक्ष केलं जाणार असल्याचं समोर आलं आहे.

विलीनीकरणासंदर्भात काही दिवसांपूर्वी शरद पवारांच्या पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी देखील प्रतिक्रिया दिली होती.मी आता काही बोलणार नाही. माझी आणि दादा यांची 11 वेळ भेट झाली होती. सहकाऱ्यांच्या काही शंका होत्या त्यावर सुद्धा चर्चा झाली होती. वेगवेगळ्या नेत्यांचे विधानं मी बघतोय. त्यावर मी काही बोलणार नाही,असं त्यांनी म्हटलं होतं.