घरफोडी करणाऱ्या आरोपीला लोणी काळभोर पोलीसांनी अवघ्या २ तासांत ठोकल्या बेड्या, ४ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त…

लोणी काळभोर : हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत घरफोडी करून फरार झालेल्या आरोपीस लोणी काळभोर पोलीसांनी अवघ्या २ तासांत जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. त्यांचेकडून ४ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी शांती शंकर सोलंकी (वय ३५, रा. पठारेवस्ती, कदमवाकवस्ती ता. हवेली, जि.पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आदित्य अरुण गरड (वय १९, रा. फ्लॅट नंबर ३०५, शुभयोग रेसिडन्सी, कदमवाकवस्ती, ता. हवेली, जि. पुणे) याला अटक करण्यात आली आहे.
फिर्यादी शांती सोलंकी या १२ फेब्रुवारी रोजी त्यांचे घरास कुलूप लावून बाहेर गेल्या होत्या. त्यामुळे घरात कोणीही नसल्याचा मोका साधून घरात प्रवेश करुन ३५ ग्रॅम सोन्याचे व ५२० ग्रॅम चांदीचे दागिणे असा एकुण ४ लाख २५ हजार रुपयांचा किमती ऐवज कोणीतरी अनोळखी इसमाने घराचा दरवाजा तोडून चोरी करुन नेलेबाबत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दाखल गुन्हयाचे तपासादरम्यान तपास अधिकारी अनिल जाधव व तपास पथकास गोपनिय बातमीदारामार्फत खात्रीशिर बातमीदारामार्फत सदर चोरी आदित्य गरड याने केली असल्याची माहिती मिळाली. प्राप्त माहितीनुसार अवघ्या २ तासांत संशयीत आरोपीस शिताफीने ताब्यात घेऊन त्यांचेकडे दाखल गुन्हयाचे अनुषंगाने तपास केला असता त्याने गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलीसांनी ३५ ग्रॅम सोन्याचे दागिणे व ५२० ग्रॅम चांदीचे दागिणे असा एकुण किंमत ४,२५,००० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन गुन्हा उघडकीस आणला आहे.
सदरची उत्कृष्ठ कामगिरी पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०६ डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभाग अनुराधा उदमले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे), लोणी काळभोर स्टेशन स्मिता पाटील, पोलीस उप निरीक्षक अनिल जाधव, पोलीस हवालदार सागर जगदाळे, रामहरी वणवे, संभाजी देवीकर, अण्णा माने, पोलीस शिपाई प्रविण दडस, सुरज कुंभार, प्रशांत सुतार, सचिन सोनवणे, राहुल कर्डीले, अशोक गिरी या पथकाने केली आहे.