थेऊर येथील अपघातात जखमी झालेल्या 15 वर्षीय ‘वीर’ चा उपचारादरम्यान मृत्यू : दोघांवर गुन्हा दाखल


पुणे: थेऊर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील गणेश वाडी परिसरात दोन ट्रक व कारचा अपघात झाल्याची घटना 7 फेब्रुवारी रोजी घडली होती. हा अपघात इतका भीषण होता की,या अपघातात कारमधील,तिघेजण जखमी झाले होते. या जखमींपैकी एका 15 वर्षाच्या मुलावर ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. या उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू (ता. 13 फेब्रुवारी )झाल्याची माहिती समोर आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार,ओव्हरटेक करण्याच्या नादात दोन ट्रक व कारचा अपघात थेऊर ग्रामपंचायत हद्दीतील गणेशवाडी परिसरात झाला. या अपघातात यश अजित सावंत (वय 20) व महेश बसवराज पुजारी (वय 22, रा. चव्हाण वस्ती, थेऊर),विर राहुल सावंत (वय- 15) हे तिघेही जखमी झाले.

या जखमीमध्ये असणारा पंधरा वर्षीय वीर राहुल सावंत याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्रउपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.याप्रकरणी महेश पुजारी यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गोटु कचरु वारे (वय 23, पांगरी मारुतीची ता शिरुर जि बिड) व मोहसीन लालामियाँ सय्यद (वय- 46, पत्ता स्टार फंक्शन हॉलजवळ, हुमनाबाद जि बिदर राज्य कर्नाटक) या दोन चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महेश पुजारी हे त्याच्या मालकाच्या कारने मित्र यश सावंत आणि वीर सावंत यांच्यासह थेऊर फाट्याकडे जात होते. त्यावेळी 16 टायर ट्रक रस्त्याच्या मधोमध धावत होता.वारंवार अप्पर-डिप्पर देऊनही ट्रकचालकाने दुर्लक्ष केले.याच क्षणी मागून येणाऱ्या सहा टायर ट्रकने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला आणि त्या ट्रकचा मागील भाग थेट कारला धडकला.

ही धडक इतक्या जोरात होती की कार झाडावर जाऊन आदळली कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या अपघातात महेश पुजारी यांना किरकोळ दुखापत झाली, तर मागील सीटवर बसलेल्या वीर सावंतच्या डोक्याला गंभीर मार लागला होता. त्यानंतर नागरिकांनी तात्काळ मदत करत वीरला लोणी काळभोर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले, मात्र पुढील उपचारासाठी ससून रुग्णालय येथे हलविण्यात आलेल्या वीरचा शुक्रवारी (ता. 13) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला.

दरम्यान, या घटनेमुळे थेऊर परिसरात हळहळ व्यक्त होत असून, अवजड वाहनांच्या बेफिकीर वाहतुकीवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!