भिवंडीत राजकीय भूकंप! महापौर निवडणुकीआधीच माजी महापौराला अटक, आरोप काय?

पुणे : राज्यातील महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर महापौर निवडीकडे सर्वांचं लक्ष लागल असताना भिवंडीत आता राजकीय खळबळ उडाली आहे.भिवंडी महापौर निवडणुकीपूर्वी माजी महापौर विलास पाटील यांना आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे. यामुळे शहरातील सत्ता समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भिवंडी महापालिका निवडणुकीत ‘किंगमेकर’ ठरण्याची क्षमता असलेले कोणार्क विकास आघाडीचे प्रमुख आणि माजी महापौर विलास पाटील यांच्यावर घराच्या नावाखाली अनेकांची फसवणूक केल्याचा गुन्हा 2025 मध्ये दाखल झाला होता. आता याच प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. या कारवाईमुळे भिवंडीत राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.
भिवंडी महापालिकेत कोणार्क विकास आघाडीचे 5 नगरसेवक आहेत. सत्ता स्थापनेसाठी लागणाऱ्या आकड्यासाठी या 5 नगरसेवकांचे समर्थन अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. पाटील यांच्या अटकेमुळे आता ही आघाडी कोणाच्या बाजूने उभी राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान आता काँग्रेस आणि भाजपकडून भिवंडी महापालिकेवर सत्ता स्थापन करण्याचा दावा केला जाऊ शकतो.भिवंडीमध्ये लवकरच महापौरपदाची निवडणूक होणार आहे, त्याआधीच राजकीय नेत्यावर मोठी कारवाई केल्यानं वातावरण तापल आहे.