‘अजितदादा… आय लव्ह यू!’ … खूप मिस करतोय दादा..; अमोल मिटकरींच भावनिक आशयाच व्हॅलेंटाईन पत्र

पुणे : महाराष्ट्राचे दिलदार व्यक्तिमत्व आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाला पंधरा दिवस होऊन गेले मात्र आजही त्यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्र शोककळेत आहे.आज व्हॅलेंटाईन डे म्हणजे आपल्या प्रिय व्यक्तीवरचं प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. आपल्या राजकीय नेत्यावर कार्यकर्तेही जीवापाड प्रेम करत असतात. अशातच आमदार अमोल मिटकरी यांनी ‘व्हॅलेंटाईन डे’ निमित्ताने पत्र लिहत अजितदादांच्या आठवणी जागवल्या आहेत.

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविषयी भावपूर्ण आशय असलेले एक पत्र सोशल मीडियावर शेअर केले आहे. ‘व्हॅलेंटाइन डे’च्या निमित्ताने लिहिलेल्या या पत्राची सुरुवात ‘तिर्थरूप आदरणीय दादा.. नमस्कार….! “माझे बुडविले घर । लेकर बाळे दारोदार । लावली काहार । तारातीर करोनी ।।”’ या ओळींनी करत त्यांनी दादांप्रती असलेला जिव्हाळा, कृतज्ञता आणि सहवासातील आठवणींना उजाळा देत ‘अजितदादा… आय लव्ह यू!’ म्हटले आहे.
पत्रात अमोल मिटकरी यांनी असे म्हटले आहे की, तुम्ही दिवंगत झालात या शब्दावर माझा विश्वास बसत नाही; माझं मन ते मान्य करायला तयार नाही. तुम्ही 2019 मध्ये राजकीय आयुष्यात संधी देत पक्षात घेतले, जबाबदाऱ्या सोपवल्या आणि आमदार होण्यापर्यंतचा प्रवास घडवून आणला, याची त्यांनी कृतज्ञतेने आठवण करून दिली. इज्जत, राजकीय प्रतिष्ठा आणि कामाची शिस्त तुम्ही दिलीत. चुका झाल्या तेव्हा त्या दुरुस्त करून पुढे जाण्याचा धडा दिलात, असेही त्यांनी नमूद केले.

अनेकांना अप्रिय वाटणारा मी मात्र दादांना प्रिय होतो, असे सांगताना ते भावूक झाले. परिवार व समाजाकडून दूर लोटले गेल्याची भावना व्यक्त करत, सुख-दुःखात खंबीरपणे पाठीशी उभे राहणारे दादा तुम्हीच होता, असे त्यांनी लिहिलेआहे. या पत्रातून त्यांनी आपल्या भावना व्यक्त करत हळहळ व्यक्त केली आहे. या पत्राची राजकीय आणि सामाजिक वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे