संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट! रिपोर्टसाठी हालचालींना वेग, घडतंय काय?

बीड : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या आली होती. या घटनेमुळे संपूर्ण राज्य हादरले होते. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तपासाला आता एक नवीन वळण मिळालं असून, या प्रकरणाच्या चौकशी अहवालावर ‘ॲक्शन टेकन रिपोर्ट’ तयार करणाऱ्या समितीच्या रचनेत राज्य सरकारने महत्त्वपूर्ण बदल केले आहेत.

दरम्यान, यापूर्वी ९ जानेवारी रोजी स्थापन करण्यात आलेल्या समितीत सह सचिव व्यंकटेश भट यांचा समावेश होता. मात्र, शासनाने शुक्रवारी काढलेल्या नवीन निर्णयानुसार भट यांच्या जागी आता सह सचिव सुग्रीव धपाटे यांची नियुक्ती करण्यात आली असून, यामुळे प्रशासकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
उच्चस्तरीय समिती अपर मुख्य सचिव (गृह) यांच्या अध्यक्षतेखाली काम करत असून, यामध्ये प्रधान सचिव (विशेष) आणि अपर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) यांसारख्या बड्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

न्यायमूर्ती एम. एल. ताहलियानी समितीने सादर केलेल्या अहवालातील निष्कर्षांची सखोल छाननी करणे, हे या समितीचे मुख्य उद्दिष्ट आहे. संतोष देशमुख यांच्या मृत्यूशी संबंधित अनेक गंभीर बाबी या अहवालात नमूद करण्यात आल्याचे समजते, ज्यावर आता ही नवीन समिती आपले मत मांडणार आहे.
समितीचे सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे ताहलियानी समितीने सुचवलेल्या अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजनांची पडताळणी करणे हे असेल. या प्रकरणातील दोषींवर नेमकी काय कारवाई व्हावी आणि भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी काय पावले उचलली जावीत, याचा सविस्तर आराखडा ही समिती तयार करणार आहे. सुग्रीव धपाटे यांच्या नियुक्तीमुळे या प्रक्रियेला आता अधिक गती मिळण्याची शक्यता असून, गृह विभागातील वरिष्ठ अधिकारी यावर बारीक लक्ष ठेवून आहेत.