हैदराबाद-पुणे बसमध्ये पती शेजारी झोपलेला असतानाच नराधमाचं पुण्याच्या महिलेसोबत भयानक कृत्य, घटनेने सगळे हादरले…

पुणे : राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

हैदराबादहून पुण्याकडे येणाऱ्या एका खासगी स्लीपर बसमध्ये धक्कादायक घटना घडली. यात एका महिला प्रवाशाचा विनयभंग झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, संबंधित महिला आपल्या पतीसोबत प्रवास करत असतानाच हा प्रकार घडला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला ९ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजता काचीगुडा (हैदराबाद) येथून एका खासगी ट्रॅव्हल्सने हडपसरच्या दिशेने येत होती. ती आणि तिचे पती स्लीपर सीटवर झोपलेले होते.

पहाटेच्या सुमारास बसमध्ये असलेल्या निशीत कुमार यशवंत सिंग (वय ४७, रा. मिरा रोड, मुंबई) याने पीडितेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. आरोपीच्या या अश्लील कृत्यामुळे महिला दचकून जागी झाली आणि तिने प्रसंगावधान राखून या घटनेचे आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ चित्रीकरण केले.
पुण्यात पोहोचल्यानंतर पीडित महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने तपासाची चक्रे फिरवली. पीडितेने दिलेला व्हिडिओ पुरावा म्हणून ग्राह्य धरत पोलिसांनी आरोपी निशीत कुमारला अटक केली. हडपसर पोलिसांनी या प्रकरणी केवळ गुन्हाच नोंदवला नाही, तर २४ तासांच्या आत तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले आहे.