लोकसभेत ‘एपस्टाईन फाईल्स ‘ वरून वातावरण तापलं ; राहुल गांधींनी अनिल अंबानींसह ‘या’ मंत्र्याचं नाव घेत सरकारला घेरल

पुणे: सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेत ‘एपस्टाईन फाईल्स’ चा मुद्दा उपस्थित केल्याने वातावरण चांगलंच तापलं आहे. लोकसभेत बजेट वरील चर्चेदरम्यान त्यांनी जगभरात गाजत असलेल्या एपस्टाईन फाईल्सचा मुद्दा उपस्थित करत अनिल अंबानी,अदानी आणि भारत अमेरिका, व्यापाराचा उल्लेख करत केंद्र सरकारला चांगलंच घेरल.

जगभरात गाजत असलेल्या एपस्टाईन फाईल्समध्ये नाव आलं असल्याचा दावा करण्यात येत असलेले उद्योगपती अनिल अंबानी आणि केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांचं नाव घेत सरकारवर प्रश्नांचा भडीमार केला. यावेळी राहुल गांधी म्हणाले की, अनिल अंबानी नावाचे एक उद्योगपती आहेत. मात्र ते अद्याप तुरुंगात का गेलेले नाहीत? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
पुढे बोलताना ते म्हणाले, केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनाही विचारायचं आहे की, त्यांची एपस्टाईनशी ओळख कुणी करून दिली. हरदीप सिंग पुरी यांची एपस्टाईन याच्याशी ओळख कुणी करून दिली याची माहिती माझ्याकडे आहे आणि ते पुरी यांनाही माहिती आहे, असा दावाही राहुल गांधी यांनी केला. दरम्यान, राहुल गांधी यांच्या या आरोपांना सत्ताधारी बाकावरील सदस्यांनी तीव्र आक्षेप घेतला.

दरम्यान पिठासीन अधिकारी जगदंबिका पाल यांनी सभागृहात अनुपस्थित व्यक्तींची नावे घेण्यास हरकत घेतली तर केंद्रीय मंत्री किरण रिजीजु यांनी राहुल गांधी यांच्यावर बिनबुडाचे आरोप केल्याचा आरोप करत संबंधित वक्तव्य कार्यवाहीतून वगळली जातील असे स्पष्ट केले.