अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पुणे जिल्ह्यातील पंचायत समित्यांवर एकहाती सत्ता, भाजपाला मोठा धक्का…


पुणे : राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समितींच्या निवडणुकांची सकाळी१० वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. सुमारे ६७ टक्के मतदान झाल्याने निकालाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली होती. १२ जिल्ह्यांतील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या शेकडो जागांसाठी रिंगणात उतरलेल्या हजारो उमेदवारांचे भवितव्य ठरलं आहे.

या निकांलात भाजपने आघाडी घेतली आहे. भाजप पाठोपाठ शिंदेंची शिवसेना आणि तिसऱ्या क्रमांकावर अजित दादांच्या राष्ट्रवादीने वर्चस्व राखण्यात यश मिळवले आहे. राजकीय वर्तुळासह सर्वसामान्यांचेही लक्ष निकालांकडे लागले आहे.

तसेच पुणे जिल्ह्यातील तेरा पैकी नऊ पंचायत समित्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेसाठी आवश्यक असलेले बहुमत मिळाले आहे. त्यामुळे या ९ पंचायत समित्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकणार असल्याचे सोमवारी (दि.९ फेब्रुवारी) स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, उर्वरित चारपैकी भाजप, शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला प्रत्येकी एका पंचायत समितीत सत्ता स्थापन करता येणार आहे. यामध्ये अनुक्रमे दौंड, जुन्नर आणि खेड पंचायत समित्यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त भोर पंचायत समितीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी चार, अशा समान जागा मिळाल्या आहेत.

त्यामुळे या पंचायत समितीचे सभापती आणि उपसभापती ही दोन्ही पदे चिठ्ठीद्वारे निश्चित करावी लागणार आहेत. जिल्ह्यातील १३ पंचायत मिळून एकूण १४६ जागा आहेत. यापैकी राष्ट्रवादी काँग्रेसला तब्बल ९३ जागांवर विजय मिळाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठोपाठ भाजपचे २९, शिवसेनेचे १०, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ९ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ५ सदस्य निवडून आले आहेत.

या पंचायत समित्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे…

पुणे जिल्ह्यातील मावळ, बारामती, पुरंदर, आंबेगाव, वेल्हे, मुळशी, शिरुर, हवेली आणि इंदापूर या नऊ पंचायत समित्यांवर राष्ट्रवादीने सत्ता मिळविली आहे.

दौंड पंचायत समितीवर भाजपची सत्ता आली आहे़. खेडमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला तर, जुन्नरमध्ये शिवसेना (शिंदे गट) सत्ता स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भोर पंचायत समितीच्या ८ जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपला प्रत्येकी चार जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे येथील पदाधिकारी हे चिठ्ठीद्वारे निश्चित करावे लागणार आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!