पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठ वादाच्या भोवऱ्यात; विद्यार्थ्याबाबतच्या ‘त्या’ निर्णयामुळे संभाजी ब्रिगेड आक्रमक….

पुणे : विद्येचे माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे वारंवार विविध कारणामुळे चर्चेत आले आहे. आता पुन्हा एकदा या विद्यापीठाकडून जारी करण्यात आलेल्या एका निर्णयामुळे संभाजी ब्रिगेड आक्रमक झाला आहे. या विद्यापीठाने नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्यात वेगवेगळ्या कामांमध्ये योगदान देऊन प्रशासनाला मदत करणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन गुण देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे नव्या वादाला ठिणगी पडली आहे.

नाशिक येथे दर बारा वर्षांनी होणारा कुंभमेळा 2026 -27 दरम्यान होणार आहे. या कुंभमेळ्यासाठी देशभरातून तसेच परदेशातून ही लाखो भाविक येतात. प्रशासनाला कुंभमेळ्याठी वेगवेगळ्या स्तरावर नियोजन करावे लागते. या पार्श्वभूमीवरच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून जारी करण्यात आलेल्या एका निर्णयाला संभाजी ब्रिगेडने विरोध केला आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने कुंभमेळ्यात सेवा देणाऱ्या विद्यार्थांना दोन ग्रेड मार्क देण्याचा निर्णय घेतलाय. पण आता भीम आर्मी पाठोपाठ संभाजी ब्रिगेडनेही त्याला विरोध केल्याने पुणे विद्यापीठाचा हा निर्णय वादात सापडला आहे. विद्यार्थ्यांना कुंभमेळ्यातील श्रमदानाला संभाजी ब्रिगेडने विरोध केला असून संघटनेची भूमिका प्रवक्ते संतोष शिंदे यांनी विद्यार्थ्यांना कुंभमेळ्यात पाठवून साधू बनवायचा आहे का असा टोला लगावला आहे.

पुढे बोलताना त्यांनी असं म्हटलं आहे की, आरएसएसच्या डोक्यातील सुपीक कल्पना विद्यापीठाच्या माध्यमातून राबवली जात असेल तर हे अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. विद्यापीठं आरएसएसचा अड्डा झाली आहेत. विद्यापीठाच्या या निर्णयाला संभाजी ब्रिगेडचा तीव्र विरोध आहे, असं संतोष शिंदेंनी म्हटलं आहे.