ब्रेकिंग! शपथविधीनंतर शरद पवार पहिल्यांदाच सुनेत्रा पवारांच्या भेटीला, कोणत्या मुद्द्यावर चर्चा होणार?

पुणे: दिवंगत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदी विराजमान झाल्या. त्यांच्या शपथविधीनंतर पहिल्यांदाच ज्येष्ठ नेते शरद पवार सुनेत्रा पवार यांच्या बारामतीमधील सहयोग सोसायटी येथील निवासस्थानी भेटीला गेले आहेत. या भेटीत अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार असल्याची माहिती आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार हे आधी सुनेत्रा पवार यांच्या सहयोग सोसायटी येथील निवासस्थाली पोहोचले. त्यानंतर शरद पवार हे देखील सुनेत्रा पवार यांच्या सहयोग सोसायटी येथील निवासस्थानाच्या दिशेला भेटीसाठी निघाल्याची माहिती समोर आली. या भेटीत नेमकी काय चर्चा होते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलं आहे.
दरम्यान रोहित पवार यांच्यासह त्यांचे आई-वडील हे देखील सहयोग सोसायटी येथील निवासस्थानी दाखल झाले आहेत. संपूर्ण पवार कुटुंबिय सुनेत्रा पवार यांच्या भेटीला आले असल्याची माहिती आहे. शरद पवार यांच्यासोबत त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार या देखील सुनेत्रा पवार यांच्या सहयोग सोसायटी येथील निवासस्थानी आले आहेत.

दरम्यान सुनेत्रा पवार यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांची आणि शरद पवारांची भेट झालेली नव्हती. त्यानंतर आज पहिल्यांदाच दोन्ही नेते समोरासमोर येत आहेत. या भेटीदरम्यान शरद पवार आणि सुनेत्रा पवार यांच्यात चर्चा होते का? ते पाहणं महत्त्वाचं आहे. दरम्यान, पार्थ पवार आणि जय पवार यांनी याआधी शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली होती.
