लाडक्या बहिणींनो योजनेची रक्कम वाढवणार का?, वाचा आता तुमच्या खात्यात किती पैसे होणार जमा..


पुणे : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै २०२४ पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते.

मात्र, आता ही रक्कम वाढवण्याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट संकेत दिले असून, लवकरच महिलांना अधिक आर्थिक मदत मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलताना त्यांनी यासंदर्भात मोठी घोषणा केली आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली होती. या योजनेचा महिलांमध्ये मोठा प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळालं आणि त्याचा राजकीय लाभही सत्ताधारी पक्षाला झाला.

निवडणूक प्रचारादरम्यान लाडक्या बहिणींना दरमहा १५०० रुपयांऐवजी२१०० रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र, सरकार स्थापन होऊन दीड वर्ष उलटून गेल्यानंतरही या रकमेत वाढ झालेली नव्हती. त्यामुळे अनेक महिलांमध्ये नाराजी दिसून येत होती. आता मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वक्तव्यामुळे आशा पुन्हा जागी झाली आहे.

एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की, लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही आणि या योजनेला कोणीही थांबवू शकत नाही. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा देत सांगितलं की, सत्ता येते जाते, पण माणसांच्या मनात निर्माण झालेलं प्रेम आणि विश्वास कायम राहतो. मी दिलेला शब्द पाळणारा आहे. आम्ही लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं आणि तो शब्द आम्ही पूर्ण करणार आहोत, असं शिंदे यांनी ठामपणे सांगितलं.

याआधीही एक-दोन वेळा त्यांनी योजनेच्या रकमेत वाढ होणार असल्याचे संकेत दिले होते. मात्र, आता पुन्हा एकदा त्यांनी अधिकृतपणे ही घोषणा केल्यामुळे लवकरच शासन स्तरावर यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यातील लाखो महिलांना या निर्णयाचा थेट फायदा होणार असून, त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाला मोठी चालना मिळणार आहे.

या भाषणात एकनाथ शिंदे यांनी केवळ लाडकी बहीण योजनेपुरतेच न थांबता शेतकरी कर्जमाफीबाबतही भूमिका स्पष्ट केली. शेतकरी कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेऊ, असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे आगामी काळात ग्रामीण भागासाठीही महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!