रांजणगाव परिसरात अंमली पदार्थ विक्रेत्यावर पोलिसांची मोठी कारवाई ; गुंगीकारक’ बंटा ‘गोळ्यांचा साठा जप्त , आरोपीकडून तब्बल 57350 रु मुद्देमाल हस्तगत


लोणी काळभोर : पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा व रांजणगाव पोलीस ठाण्याचे पथकाने रांजणगाव परिसरात 203 किलोग्रॅम वजनाच्या अंमली पदार्थ मिश्रीत गुंगीकारक बंटा गोळया विक्री करण्याकरिता जवळ बाळगणाऱ्या आरोपीस ताब्यात घेवून त्यांचेकडून एकूण 57 हजार 350 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

केंद्र शासनाचे नशामुक्त भारत अभियानाचे अनुषंगाने पुणे ग्रामीण हद्दीत अंमली पदार्थ तसेच तंबाखुजन्य पदार्थाची बेकायदेशीर रित्या विक्री अगर सेवन होऊ नये याकरीता पुणे ग्रामीण जिल्हयाचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी अवैध व्यवसायांवरील कारवाईचा बडगा चालू ठेवत नवीन वर्षाच्या सुरूवातीस अवैधरित्या अंमली पदार्थ व तंबाखुजन्य पदार्थ विनापरवाना जवळ बाळगणारे विक्री करणारे व्यक्तींवर कारवाई करण्याचे आदेश पुणे ग्रामीण पोलीसांना केले होते.

या आदेशानुसार 10 जानेवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रांजणगाव एम.आय.डी.सी. परिसरात गस्त घालत असताना रांजणगाव हद्दीतील सरकारी दवाखान्याजवळ राहणारा विपुल विटकर हा त्यांच्या राहत्या घरामध्ये तसेच घराजवळील त्याचे पानटपरी मध्ये बंटा नावाच्या गुंगीकारक अंमली पदार्थ गांजा मिश्रीत गोळ्या बेकायदा जवळ बाळगून विक्रीसाठी ठेवत होता, अशी गोपनीय बातमी पथकातील पोलीस हवालदार तुषार पंदारे यांना मिळाली.

या बातमीचे अनुषंगाने पथकाने कायदेशीर तरतुदींची पुर्तता करत उपविभागीय पोलीस अधिकारी शिरूर विभाग शिरूर यांचे आदेश प्राप्त केले. छापा कारवाईचे सर्व साहीत्य व पंचांसह पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा व रांजणगाव पोलीस ठाण्याचे पथक संयुक्त कारवाई साठी रवाना झाले. या पथकाने त्या ठिकाणी जावून छापा टाकत कारवाई केली. कारवाई दरम्यान 203 किलो 600 ग्रॅम वजनाचा गुंगीकारकर गांजा अंमली पदार्थ मिश्रीत बंटा नावाच्या गोळया असा एकूण 57 हजार 350रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला आहे.

सदर कारवाई मध्ये विपुल संदीप विटकर, (वय २० वर्षे रा. रांजणगाव गणपती ता शिरूर जि पुणे) याच्यावर सरकारतर्फे फिर्यादी होऊन पोलीस हवालदार तुषार अशोक पंदारे यांनी रांजणगाव एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, शिरुर उपविभाग, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ, रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात, पोलीस अंमलदार तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजू जाधव, सागर धुमाळ, राजू मोमीण, राहुल पवार, दत्तात्रय शिंदे, विजय सरजिने, विलास आंबेकर यांनी केली असून सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात, रांजणगाव पोलीस स्टेशन हे करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!