पुण्यात खळबळ! नामांकित डॉक्टरांचे अपहरण करून उकळली १९ लाखांची खंडणी, उरुळी कांचन पोलीस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल…


उरुळी कांचन : पूर्व हवेलीतील एका नामांकित डॉक्टरांचे अपहरण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना उघडकीस आली आहे. तसेच तब्बल १९ लाख रुपयांची खंडणी उकळल्याची गंभीर व धक्कादायक घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी पाच अनोळखी इसमांविरोधात उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि घटना शनिवारी (ता.१०) ते सोमवारी (ता. १२) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास प्रयागधाम फाट्याच्या पुढे इनामदारवस्ती परिसरात घडली आहे. याप्रकरणी संबंधित डॉक्टरांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, फिर्यादी डॉक्टर यांचे पुणे-सोलापूर महामार्गावरील एका गावात स्वतःचे रुग्णालय आहे. शनिवारी रात्री सव्वा दहा ते साडे दहा वाजता त्यांच्या चारचाकी गाडीने प्रवासासाठी निघाले होते. यावेळी त्यांच्याबरोबर गाडी चालक व रुग्णालयातील एक मदतनीसही सोबत होते. कोरेगाव मूळ (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील इनामदारवस्ती परिसरात आले असता पांढऱ्या रंगाच्या एर्टीगा कारने आलेल्या पाच अनोळखी इसमांनी त्यांची गाडी अडवली.

आरोपींनी तिघांचे अपहरण करून धारदार शस्त्राचा धाक दाखवत फिर्यादीला मारहाण केली. तसेच एका आरोपीने फिर्यादीच्या उजव्या हाताच्या दंडाला चावा घेतल्याचा प्रकार घडला. आरोपींनी फिर्यादी, त्यांचे सहकारी व त्यांच्या कुटुंबीयांना जीवे ठार मारण्याची धमकी देत २० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली.

अखेर आरोपींनी जबरदस्तीने १९ लाख रुपये रोख स्वरूपात स्वीकारून तिघांना ताब्यात ठेवले. हा प्रकार सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत सुरू होता. फिर्यादी डॉक्टर यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी विलंब केल्याने सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील विविध कलमान्वये अज्ञात आरोपींवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

दरम्यान, गुन्हा दाखल होताच उपविभागीय पोलीस अधिकारी दौंड विभाग बापूराव दडस, पोलीस निरीक्षक सचिन वांगडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सिद्ध पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!