ओला, उबेरच्या रिक्षांना पुणे शहरात ब्रेक! प्राधिकरणाचा मोठा निर्णय


पुणे : ओला, उबेरबाबत सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. पुणे शहरात ॲपवर आधारित ओला, उबरला अधिकृत परवाना देण्यास पुणे परिवहन प्राधिकरणाने नकार दिला आहे. त्यामुळेच बाईक टॅक्सी प्रमाणेच ओला, उबेरच्या रिक्षांना पुण्यामध्ये सध्यातरी बंदी घालण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
ओला, उबेरने तीनचाकी टॅक्सीसाठी समुच्चयक परवाना मिळवण्यासाठी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडे अर्ज केला होता. परंतु पुण्यातील ओला, उबेर रिक्षांचा परवाना प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने नाकारला आहे. प्रवासी अॅग्रिगेटरचा परवाना आरटीओने नाकारल्यामुळे पुणेकरांना आता ओला, उबेरच्या रिक्षाने प्रवास करता येणार नाही.

हा निर्णय मोटार वाहन कायद्याअंतर्गत अॅग्रिगेटसाठी ठरवून देण्यात आलेल्या नियमांनुसार आवश्यक त्या तरतुदींची पूर्तता न केल्याने पुणे परिवहन विभागाने हा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, रॅपिडोतर्फे पुण्यामध्ये मोबाइल अॅपद्वारे बाईक टॅक्सी सेवा सुरू होती. मात्र रॅपिडोकडे अॅग्रिगेटर लायसन्स नसल्याने पुण्यातील रिक्षा संघटनांनी याविरुद्ध आंदोलन सुरू केले होते.
त्यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने या बाईक टॅक्सी आणि रॅपिडो कंपनीवर कारवाई केली. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.