पुण्यात वातावरण तापलं! रवींद्र धंगेकरांनी मतदानापूर्वी शेअर केला डान्सबारचा व्हिडिओ अन भाजप उमेदवारांवर ‘चारित्र्यहीन’ चा शिक्का

पुणे : महापालिका निवडणुकीच्या मतदानापूर्वी शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी महायुतीवर विशेषतः भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांवर पैसा, सत्ता आणि डान्सबार यावरून केलेल्या आरोपाने खळबळ उडाली आहे.पुणेकरांच्या घामाचा पैसा महापालिकेतून लुटला गेला आणि तो आता डान्सबारमध्ये बारबालांवर उधळला जात आहे, असा खळबळजनक दावा धंगेकर यांनी केला आहे.

महापालिका निवडणुका तोंडावर असताना शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये भाजप उमेदवाराच्या पतीचा डान्सबारमधील व्हिडीओ शेअर केला आहे. त्यासोबतच हा व्यक्ती शिवाजीनगर मतदारसंघाच्या आमदारांचे सर्व आर्थिक विषय सांभाळतो, असा आरोपही केला आहे. या आरोपांमुळे पुण्याच्या राजकीय वातावरणात मोठी खळबळ उडाली असून, आता भाजप आणि शिवसेना यावर काय प्रत्युत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी उद्या (15 जानेवारी )मतदान होणार आहे. प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी केलेल्या आरोपाने खळबळ उडाली आहे.त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.

एकनाथ शिंदेंनी लाडकी बहीण योजना आणून महिलांचा सन्मान करण्याचा दावा केला. मात्र, त्यांचेच उमेदवार डान्सबारमध्ये महिलांवर पैसे उधळताना दिसत आहेत. हा कसला महिलांचा सन्मान? डान्सबारमध्ये पैसे उधळून तुम्ही तिथल्या महिलांना लखपती दीदी बनवत आहात का? असा सवाल धंगेकर यांनी केला आहे.
पुढे बोलताना त्यांनी पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ आणि मंत्री चंद्रकांत पाटील हे संस्कृतीच्या गप्पा मारतात. मग त्यांच्याच पक्षात ही अशी ‘पिलावळ’ कशी वाढतेय? या भ्रष्ट आणि चारित्र्यहीन लोकांमुळे पक्ष बदनाम होत आहे, याचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे, असे रवींद्र धंगेकर म्हणाले आहेत. निवडणुकीच्या तोंडावर केलेल्या या आरोपाने पुण्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.