पुण्यातील येरवडा कारागृहातील कैद्यांची सुरक्षा ऐरणीवर; वृद्ध कैद्याला अमानुष मारहाण, मेंदूतुन भयंकर रक्तस्राव

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात वारंवार हिसंक घडताना दिसत आहेत.काही दिवसांपूर्वीच एका कैद्याचा फरशीने ठेचून खून करण्यात आला होता.त्यानंतर आता कारागृहातील अंतर्गत वादातून एका ६५ वर्षीय वृद्ध कैद्याला अमानुष मारहाण करण्यात आली आहे.त्यामुळे पुन्हा एकदा कैद्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, देवकरप्पा गराळे (वय 65) असे जखमी झालेल्या कैद्याचं नाव आहे. कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या फजल अहमद अब्दुलकयुम अन्सारी या कैद्याने गराळे यांना अत्यंत क्रूरपणे मारहाण केली. ही मारहाण इतकी भयंकर होती की, गराळे यांच्या मेंदूत रक्तस्राव झाला आहे.
याप्रकरणी कारागृह हवालदार प्रकाश भोसले यांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी आरोपी कैदी फजल अन्सारी याच्यावर गंभीर दुखापत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक सी. बी. बेरड या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

दरम्यान मारहाण केलेल्या कैद्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.एका वृद्धाला झालेल्या अमानुष मारहाणीमुळे कारागृह प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.