ब्रेकिंग! धनंजय मुंडे पुन्हा मंत्री होणार? माणिकराव कोकाटे संकटात असताना दिल्ली दौऱ्यावर

पुणे :क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांना 1995 च्या सदनिका गैरव्यवहार प्रकरणात अटक वॉरंट जारी केल्याने राजकीय वर्तुळात घडवणारे आहे.या सर्व घडामोडी घडत असताना आता माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे आता पुन्हा अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. एकीकडे कोकाटे यांचे मंत्रिपद धोक्यात आलेले असतानाच मुंडे दिल्लीच्या दौऱ्यावर गेले आहेत. त्यामुळे ते पुन्हा मंत्री होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार अजित पवार यांच्या पक्षाचे नेते तथा माजी मंत्री धनंजय मुंडे सध्या दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. आपल्या या दौऱ्यामध्ये त्यांनी एनडीएच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली आहे. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली आहे? हे अद्याप समोर येऊ शकलेले नाही. कोकाटे यांचे मंत्रिपद धोक्यात आलेले असतानाच धनंजय मुंडे हे दिल्ली दौऱ्यावर गेलेले असल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. कोकाटे यांची जागा आता धनंजय मुंडे घेणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान माणिकराव कोकाटे हे विधिमंडळातील सभागृहात ऑनलाईन रमी खेळताना दिसून आले होते. तेव्हाही कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती. त्यावेळीदेखील धनंजय मुंडे सक्रीय झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. आता धनंजय मुंडे थेट दिल्लीला गेले आहेत.

दुसरीकडे माणिकरा कोकाटे यांचे मंत्रिपद कोणत्याही क्षणी जाऊ शकते असे सांगितले जात आहे. कोकाटे यांनी उच्च न्यायालयात केलेल्या अर्जावर आता शुक्रवारी (19 डिसेंबर) सुनावणी होणार आहे. महायुतीमध्ये आता कोकाटे यांचे मंत्रिपद गेले तर त्याची जागा कोणाला द्यावी, यावरही आता चर्चा सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता भविष्यात काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.