महाविकास आघाडीत पहिल्यांदाच मनसेची एन्ट्री, महायुतीला मोठं आव्हान, कोणत्या ठिकाणी अधिकृत घोषणा?

मुंबई : आगामी मुंबई महापालिकेसह इतर महापालिकांच्या निवडणुकीसाठी राज ठाकरे यांच्या मनसेची महाविकास आघाडीत एन्ट्री होणार का, याची चर्चा सुरू असताना मुंबई महापालिकेत काँग्रेसने मनसेला विरोध केला आहे.मात्र दुसरीकडे महत्त्वाची घडामोड घडली आहे. मनसेची आता महाविकास आघाडीमध्ये एन्ट्री झाली असून त्याची अधिकृत घोषणा झाली आहे.

सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस आणि मनसे एकत्र लढणार असल्याची माहिती समोर आली आहे.राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने एकत्र येत महाविकास आघाडीच्या झेंड्याखाली निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या आघाडीला वंचित बहुजन आघाडी आणि समाजवादी पक्षानेही उघड पाठिंबा जाहीर केला. याच आघाडीत आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची एन्ट्री झाली आहे. स्थानिक काँग्रेस नेत्यांनी मनसेला हिरवा कंदील दाखवला आहे.
सोलापूर महानगरपालिकेत काँग्रेस आणि मनसे एकत्र लढणार असल्यामुळे महाविकास आघाडीतील समीकरणांवर परिणाम होणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान आता मनसेची महाविकास आघाडीत एन्ट्री झाल्यामुळे महायुतीसमोर सोलापूरमध्ये एकत्रित आणि आक्रमक विरोधकांचे तगडे आव्हान उभे राहण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
