मुंबई- पुणे महामार्ग अपघातात मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत, मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई : जुन्या पुणे मुंबई महामार्गावर एक मोठी घटना घडली आहे. येथे खासगी बस दरीत कोसळली आहे. बोरघाटातील शिंगरोबा मंदिराजवळ पहाटे चारच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
तसेच वीस ते पंचवीस प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. प्रवाशांना दरीतून वर काढण्यात येत आहे.
जखमींना स्थानिक नागरिकांच्या मदतीनं उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. भीषण अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
या अपघातातील मृत आणि त्यांच्या कुटुंबिंयाप्रति सहवेदना प्रकट करुन या दुर्दॅवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केली आहे.
अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायगडचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांशी दूरध्वनीवर संपर्क साधून या घटनेची माहिती घेतली. अपघातग्रस्तांना तातडीने मदत करण्याच्या सूचना देतानाच जखमींना शासकीय खर्चाने तात्काळ वैद्यकीय उपचार पुरविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.