महायुतीतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर ; आधी मंत्र्यांचा बहिष्कार अन आज शिंदेंची मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात दांडी…

पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना राज्यातील सत्ताधारी महायुतीमधील अंतर्गत कलह पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.नुकत्याच मंगळवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीवर शिंदे गटाच्या मंत्र्यांनी बहिष्कार घातला होता. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्र्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. मात्र, फडणवीस यांनीच पलटवार करत झापलं होतं. त्यानंतर आज मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीतील कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दांडी मारली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, राज्याच्या पोलीस विभागाच्या एका महत्वाच्या अधिकृत कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघेही उपस्थित होते. मात्र कार्यक्रमाच्या पत्रिकेत नाव असूनही एकनाथ शिंदे गैरहजर राहिल्याने चर्चांना उधाण आले आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दांडी मारल्याने राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. कार्यक्रम सरकारी स्वरूपाचा आणि उच्चस्तरीय मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणारा असल्याने तिन्ही नेते एकाच व्यासपीठावर दिसतील, अशी अपेक्षा होती. पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक उपस्थित राहिले नाहीत. त्यांच्या अनुपस्थितीमागचं नेमकं कारण अजूनही उघड झालेलं नाही. शिंदे गटाकडून किंवा सरकारकडून अधिकृत प्रतिक्रिया न आल्यामुळे विविध अंदाजांना उधाण आले आहे.
विशेष म्हणजे कार्यक्रम पत्रिकेत एकनाथ शिंदे यांचं नाव स्पष्टपणे छापलेलं होतं, ज्यावरून त्यांची उपस्थिती अपेक्षित असल्याचं स्पष्ट होतं. त्यामुळे अचानक केलेल्या गैरहजेरीमागे राजकीय नाराजी? आरोग्य कारणे? की दुसरा काही अत्यावश्यक दौरा? याबाबत तर्क वितर्क लावले जात आहेत.
