कॅबिनेट बैठकीत दांडी मारलेल्या शिंदेंच्या मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी झापलं ; म्हणाले……


पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आधीच महायुती मधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे.महायुतीमधील मोठा पक्ष असलेल्या भाजपनं सुरु केलेला पक्षविस्तार शिंदेसेनेसाठी चिंतेचा आणि अडचणीचा विषय ठरत आहे. शिंदेसेनेची ताकद असलेल्या भागांमध्ये भाजपनं नेत्यांना गळाला लावण्याचा धडाका लावला आहे. याचे पडसाद आज कॅबिनेट बैठकीत उमटले. शिंदेसेनेच्या सगळ्या मंत्र्‍यांनी आज झालेल्या कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार टाकला. यानंतर या नाराज शिंदेंच्या मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी चांगलंच झापलं आहे.सुरुवात तुम्ही केली. तुम्ही करणार असाल तर चालवून घ्यायचं आणि भाजपनं केलं तर चालणार नाही, असं होणार नाही, अशा स्पष्ट शब्दांत फडणवीसांनी शिंदेसेनेच्या मंत्र्‍यांना झापलं.

समोर आलेल्या माहितीनुसार, आजचा कॅबिनेट बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वगळता एकही शिवसेनेचा मंत्री उपस्थित नव्हता. यावरून राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत. या नाराज झालेल्या शिंदे सेनेच्या मंत्र्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगलच सुनावलं आहे. उल्हासनगरमध्ये सुरुवात तुम्ही केली, तुम्ही करणार असाल तर चालवून घ्यायचं आणि भाजपनं केलं तर चालणार नाही, असं होणार नाही.यापुढे एकमेकांच्या नेते, पदाधिकाऱ्यांना प्रवेश देऊ नका. दोन्ही पक्षांनी पथ्यं पाळावीत. तुम्ही पथ्यं पाळणार असाल, तर भाजपही पथ्यं पाळेल, असं मुख्यमंत्री फडणवीसांनी सुनावलं.

गेल्या काही दिवसांपासून भाजप सेनेच्या माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना स्वत:कडे घेत आहेत. त्यांचे पक्षप्रवेश उरकले जात आहेत. ज्यांच्या विरोधात निवडणुका लढवल्या, त्याच उमेदवारांना भाजप आपल्याकडे घेत आहेत. त्यामुळे शिंदेसेनेत प्रचंड अस्वस्थता आहे. युतीचा धर्म पाळला जात नाही, अशी शिंदेसेनेची तक्रार आहे.त्यामुळेच शिंदेसेनेचे मंत्री कॅबिनेट बैठकीला दांडी मारून आज फडणवीसांच्या भेटीला गेले होते.त्यावेळी फडणवीसांनी शिंदेसेनेच्या मंत्र्यांची चांगलीच कानउघाडणी केली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!