ब्रेकिंग! ऐन निवडणुकीत संगमनेर मध्ये निवडणूक आयोगाने जप्त केली एक कोटीची रोकड ; कोणाची रोकड ?समोर आली मोठी अपडेट..

पुणे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे.नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरू असतानाच आता अहिल्यानगरच्या संगमनेर शहराच्या प्रवेशद्वारावर एक कोटींचीं रोकड सापडल्याने खळबळ उडाली होती. या रोकड प्रकरणाचा मोठा खुलासा झाला आहे.ही रक्कम अजमेरा आणि अक्षया कंस्ट्रक्शन कंपनीची असल्याचे स्पष्ट झाले आहे. या दोन्ही कंपन्यांनी रकमेचे बँक व्यवहार आणि संबंधित दस्तऐवज पोलिसांनी व निवडणूक अधिकाऱ्यांनी मागितल्यावर सादर केले आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार, संगमनेर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या प्रवेशद्वारावर आढळलेल्या एक कोटींच्या रोकड प्रकरणाचा मोठा खुलासा झाला आहे. खांडगाव फाटा येथे शनिवारी दुपारी निवडणूक आयोगाच्या सर्वेक्षण पथकाने एका कारमधून तब्बल 1 कोटींची रक्कम जप्त केली होती.ही रक्कम धाराशिव येथील बँकेतून काढण्यात आली होती. निवडणूक आयोगाच्या पथकाने केलेल्या तपासणीनंतर रात्री उशिरा मोजदाद पूर्ण करून संपूर्ण रक्कम निवडणूक अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली.निवडणूक आयोगाकडून सध्या कागदपत्रांची अंतिम पडताळणी सुरू आहे. उपलब्ध पुराव्यांच्या आधारे, ही रोकड निवडणुकीतील गैरव्यवहारासाठी वापरण्याचा उद्देश नसल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. पडताळणी पूर्ण झाल्यानंतर रक्कम संबंधित कंपनीकडे परत हस्तांतरित करण्यात येणार आहे.
दरम्यान निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झालेली असताना एवढी मोठी रक्कम जप्त झाल्याने शहरात चर्चांना ऊत आला होता. या पाठीमागे राजकीय हेतू असण्याची शक्यता, पैसे नेमके कुठे वापरले जाणार होते, आणि याचा निवडणुकीशी काही संबंध आहे का, या सर्व प्रश्नांवरून वादंग निर्माण झाले. मात्र, तपासात कंपन्यांनी दस्तऐवज सादर केल्यानंतर परिस्थितीत स्पष्टता आली आहे.
