ठाकरेंना मोठा धक्का ; ऐन निवडणुकीच्या तोंडावर माजी महापौरांसह नगरसेविकाचा भाजपात प्रवेश…

पुणे : राज्यात स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत, येत्या दोन डिसेंबर रोजी नगरपरिषद आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर तीन डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे, दरम्यान त्यानंतर लगेचच महापालिका निवडणुका देखील होण्याची शक्यता आहे.या पार्श्वभूमीवर आता शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का भाजपने दिला आहे.उल्हासनगरमध्ये ठाकरे गटाच्या माजी महापौर विद्याताई निर्मले यांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत माजी नगरसेविका शितल मंडारी यांनी देखील भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतराला सुरुवात झाली असून भाजपने शिवसेना शिंदे गट आणि काँग्रेसला देखील मोठा धक्का दिला आहे. काँग्रेसचे माजी नगरसेवक गोदुमल कृष्णानी यांनी आणि शिवसेना शिंदे गटाचे सह संपर्कप्रमुख विजय जोशी यांनी देखील भाजपात प्रवेश केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपात जोरदार इनकमिंग सुरू असल्यानं या निवडणुकीत भाजपची ताकद वाढत आहे.दरम्यान या पक्षप्रवेशावर प्रतिक्रिया देताना भाजपचे उल्हासनगर प्रचार प्रमुख प्रदीप रामचंदानी यांनी म्हटलं की, शिवसेना ठाकरे गटाच्या माजी महापौर विद्याताई निर्मले आणि काँग्रेसचे माजी नगरसेवक गोदुमल कृष्णानी आणि त्यांच्या चिरंजीवांनी भाजपात प्रवेश केला आहे. शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकांनी देखील भाजपात प्रवेश केला आहे.
दरम्यान या पक्षप्रवेशावर शितल मंडारी यांनी म्हटलं की, पक्षात गळचेपी होत नव्हती, मात्र केंद्रात मोदी आणि महाराष्ट्रात फडणवीस यांचं सरकार आहे, दोन्ही सरकार चांगलं काम करत आहेत. कल्याण पूर्वेचा जास्तीत जास्त विकास व्हावा यासाठी मी भाजपात प्रवेश केला आहे,माझी कोणावरही नाराजी नाही असं त्यांनी म्हटले आहे.
