काँग्रेसला मोठा धक्का ; दोन माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश..

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना आता काँग्रेसला मोठा धोका बसला आहे.डोंबिवली शहर पूर्व विभागातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी नगरसेवक सदाशिव शेलार आणि त्यांच्या पत्नी, माजी नगरसेविका दर्शना शेलार यांनी काँग्रेसची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश केला आहे. या दोन प्रमुख नेत्यांसोबत त्यांचे शेकडो निष्ठावान कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनीही एकाच वेळी भगवा हाती घेतला. त्यामुळे कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात काँग्रेसच्या गडाला जबरदस्त खिंडार पडले आहे.

नगरसेविका दर्शना शेलार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.हा महत्त्वाचा पक्षप्रवेश सोहळा मुंबईत पार पडला. यावेळी पक्षाचे प्रमुख नेते तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रमुख उपस्थित होते. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रवेश समारंभ आयोजित करण्यात आला होता. शेलार दाम्पत्याचा हा निर्णय डोंबिवलीच्या स्थानिक राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
माजी नगरसेवक सदाशिव शेलार हे काँग्रेसमध्ये एक प्रभावी चेहरा म्हणून ओळखले जात होते, तर त्यांच्या पत्नी दर्शना शेलार यांनीही आपल्या कार्यकाळात नगरसेविका म्हणून आपला ठसा उमटवला होता. त्यांच्या या सामूहिक प्रवेशामुळे काँग्रेसची स्थानिक ताकद लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. तसेच आगामी महापालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे गणित पूर्णपणे बिघडण्याची शक्यता आहे.यामुळे डोंबिवलीतील काँग्रेसच्या गोटात जोरदार चर्चा रंगली असून पक्ष पातळीवर चिंता व्यक्त केली जात आहे.
