पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा! मदतीची हेक्टरी मर्यादा वाढली, राज्यभरात कोट्यवधींचा निधी वाटप, कोणत्या विभागाला किती मदत मिळणार?

मुंबई : राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. याआधी केवळ दोन हेक्टरपर्यंतच्या शेतीसाठी दिली जाणारी मदत आता तीन हेक्टरपर्यंत वाढवण्यात आली आहे.

तसेच या वाढीव एक हेक्टर क्षेत्रासाठी ६४८ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला असल्याची माहिती मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली. मंत्री पाटील यांनी सांगितले की, आतापर्यंत पूरग्रस्त शेतकऱ्यांना ८,००० कोटींपेक्षा अधिक मदत वितरित करण्यात आली आहे.

तसेच राज्यातील सुमारे सहा लाखांहून अधिक शेतकऱ्यांना थेट बँक खात्यात आर्थिक मदत मिळाली आहे. यामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शेती पुन्हा उभी करण्यास मदत होईल.

विभागनिहाय पाहता, छत्रपती संभाजीनगर विभागात बीड, लातूर, जालना, नांदेड, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना सर्वाधिक म्हणजेच सुमारे ३४६ कोटी रुपयांची मदत मिळणार आहे. पुणे विभागात, विशेषत: सोलापूर आणि सांगली जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी १०३ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे.
दरम्यान, अमरावती विभागातील शेतकऱ्यांसाठी १०७ कोटी रुपयांची तर नाशिक विभागासाठी ५९ कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. नागपूर विभागात सुमारे ८ हजार हेक्टर क्षेत्रातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ७ कोटी ५० लाखांची मदत मिळणार आहे.
कोकण विभागातील नुकसान तुलनेने कमी असले तरी ठाणे आणि पालघर येथील काही शेतकऱ्यांनाही मदत दिली जाणार आहे. राज्य सरकारचा हा निर्णय आगामी हंगामात शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यास आणि शेतीची पुनर्बांधणी करण्यास मोठा आधार देणार आहे. पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांना प्रतिसाद देत घेतलेला हा निर्णय ग्रामीण भागासाठी दिलासादायक ठरला आहे.
