कुख्यात गुंड निलेश घायवळच्या नादात पोलीसच अडकणार ; ‘ते’ प्रकरण अंगलट येणार?

पुणे : गेल्या काही दिवसापासून कुख्यात गुंड निलेश घायवळ आपल्या गुन्हेगारी कृत्यामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. मकोका प्रकरणात त्याला गुन्ह्यात जामीन देताना न्यायालयाने 30 नोव्हेंबर 2022 रोजी पासपोर्ट न्यायालयात जमा करण्याचा आदेश दिला होता. मात्र, त्यावेळी घायवळने पासपोर्ट जमा केला नाही; तसंच त्याच्याकडे याबाबत पोलिसांनीही चौकशी केली नाही. या प्रकरणावरून आता पुणे पोलिसांनी अहिल्यानगरमधील तत्कालीन पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढणार आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, शहरातील कुख्यात गुंड नीलेश घायवळ याच्या पासपोर्ट प्रकरणात तत्कालीन अहिल्यानगर पोलीस अधीक्षक कार्यालयांतर्गत येणाऱ्या अहिल्यानगर पोलिसांच्या भूमिकेवर पुणे पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे. तसंच पुणे पोलिसांनी तत्कालीन पोलीस निरीक्षक आणि संबंधित कर्मचाऱ्यांना नोटीस बजावली आहे. या अधिकाऱ्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले असून पुणे पोलिसांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येत आहे.
दरम्यान, कोथरूड गोळीबार प्रकरणामध्ये आरोपी करण्यात आल्यानंतर नीलेश घायवळच्या पासपोर्टचा प्रश्न उपस्थित झाला. याप्रकरणी त्याला मदत कोणी केली व पोलीस यंत्रणेमधील कोणाच्या संगनमताने पासपोर्ट पडताळणी पार पडली की पासपोर्ट विभागातच त्याने ‘सेटिंग’ लावले होते, याकडं आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.