यवत येथून २८ लाखांचा गुटखा जप्त; एकावर गुन्हा दाखल…

लोणी काळभोर : दौंड तालुक्यातील यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोरीऐंदी गावाच्या हद्दीतून पोलिसांनी तब्बल २८ लाख रुपये किंमतीचा मानवी जीवनास हानिकारक असणारा गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी एकावर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई गुरुवार (९ ऑक्टोबर) रोजी सायंकाळच्या सुमारास करण्यात आली आहे.

यवत पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी याप्रकरणी हवालदार मोहम्मद अली मड्डी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नवनाथ रतन झुरुंगे (रा. झुरुंगे वस्ती, बोरीऐंदी ता. दौंड) याचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या घराच्या परिसरात असलेल्या शेडमधून आर. एम. डी. पान मसाला व तंबाखुचे बॉक्स, डायरेक्टर पान मसाला व शॉट 999 तंबाखु, विमल पान मसाला व तंबाखुचे बॉक्स असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

नवनाथ झुरुंगे याचे घराशेजारी एक पत्र्याचे शेड आहे. या शेडमध्ये त्याने पान मसाला व इतर साहित्य असा अवैध गुटखा साठवून ठेवला होता.याची माहिती पोलिसांना माहिती मिळताच सदर ठिकाणी छापा टाकून २८ लाख रुपये किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांवरील बंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी नवनाथ झुरुंगे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरातील अवैध गुटखा व्यापारावर आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सदर कारवाई यवतचे पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय कोल्हे करीत आहेत.
