मोठी बातमी! गुंड घायवळच्या भावाला शस्त्र परवाना का दिला? योगेश कदमांनीं सांगितलं गुपित…

पुणे : कुख्यात गुंड निलेश घायवळ याचा भाऊ सचिन घायवळ याला शस्त्र ठेवण्याचा परवाना देण्यात आला आहे. या प्रकरणात आता गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचे नाव समोर आले आहे. त्यांच्या सहीनंतरच सचिन घायवळ याला शस्त्र बाळगण्याचा परवाना देण्यात आला, अशी बाब समोर आली आहे. यावरून विरोधकाकडून टीकेची झोड उडाली असताना आता योगेश कदम यांनी प्रत्यक्ष समोर येत सविस्तर माहिती दिली आहे. मी राज्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर असताना गुन्हे प्रलंबित असलेल्य किंवा गुन्हा दाखल असलेल्या एकाही व्यक्तीला शस्त्रपरवाना दिलेला नाही, असे कदम यांनी सांगितले आहे.
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी असे म्हटले आहे की, शस्त्रपरवाना देण्याचा निर्णय संबंधित पोलीस आयुक्तांच्या सहीने घेतला जातो. मी याची सविस्तर माहिती पत्रकार परिषद घेऊन देणार आहे. मी सोशल मीडियाच्या माध्यमातूनही स्पष्टीकरण दिलं आहे. विरोधक मात्र टीका करत आहेत. मी या खुर्चीवर बसलेला असल्यापासून गुन्हे प्रलंबित असलेल्या किंवा गुन्हे दाखल असलेल्या एकाही व्यक्तीला शस्त्रपरवाना देण्याची माझ्याकडून शिफारस झालेली नाही, असे स्पष्टीकरण कदम यांनी दिले आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, सचिन घायवळ याच्यावर एकही गुन्हा दाखल नव्हता, जेव्हा शस्त्रपरवान्यासाठी अपील केली जाते तेव्हा ती वैयक्तिक स्वरुपाची असते. तो कोणाचा भाऊ आहे, कोणाशी संबंध आहेत हा मुद्दा नसतो. सचिन घायवळ याच्यावर 15 ते 20 वर्षांपूर्वी जे काही गुन्हे दाखल होते, त्यातून त्याची 2019 साली माननीय न्यायालयाने निर्दोष मुक्तता केलेली आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊनच मी सद्सदविवेक बुद्धीने मी निर्णय घेतलेला आहे, अशी विस्तृत माहिती यावेळी कदम यांनी दिली.