पालकांनो सावधान! ‘या’ कफ सिरपवर महाराष्ट्रात बंदी, चिमुकल्यांना चुकूनही देऊ नका…

पुणे : महाराष्ट्र सरकारने लहान बालकांच्या आरोगाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने वादग्रस्त ठरलेल्या कप सिरफ ‘कोल्ड्रिफ’वर बंदी घातली आहे. राज्याच्या अन्न आणि नागरी पुरवठा विभागाकडून हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये दूषित कफ सिरपमुळे लहान मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. यामध्ये १८ लहान मुलांचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कोल्ड्रीफ सिरपच्या विक्रीवर महाराष्ट्रात बंदी घातली असून या औषधाचा वापर तातडीने थांबवण्याचे आवाहन केले आहे.

राज्याच्या ‘एफडीए’ चे औषध नियंत्रक डी. आर. गहाने यांनी ही तातडीची सूचना जारी केली आहे. ‘कोल्ड्रिफ सिरप’ बॅच क्रमांक एसआर-१३ याचे उत्पादन मे २०२५ ला झाले आहे. या सिरपमध्ये ‘डायथिलीन ग्लायकॉल’ (डीइजी) नावाचे विषारी द्रव्य मिसळले असल्याचा आरोप आहे.

दरम्यान, हे रसायन मानवासाठी अत्यंत घातक असून, यामुळे गंभीर विषबाधा किंवा मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे सर्व परवाना धारक औषध विक्रेते आणि नागरिकांना या बॅचमधील सिरपचा विक्री, वापर किंवा वितरण तातडीने थांबवण्याचे आणि त्यांनी आधीच खरेदी केलेले असल्यास त्याबाबत स्थानिक औषध नियंत्रण प्राधिकरणाला कळविण्याचे निर्देश दिले आहेत.
या सिरपचा साठा आढळल्यास तो तत्काळ जप्त करण्याचे आदेश औषध निरीक्षक आणि सहायक आयुक्तांना देण्यात आले आहेत. नागरिकांनी याबाबत खबरदारी घेण्याचे आणि या औषधाचा वापर न करण्याचे आवाहन केले आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर सरकारने पुढील नुकसान टाळण्यासाठी आवश्यक पावले उचलल्याचेही सांगण्यात आले आहे.
