PMP चा मोठा निर्णय ;पुण्यातील बसच्या स्टेअरिंगवर आता लवकरच महिला चालक असणार..

पुणे: पुणे महानगर परिवहन महामंडळात कार्यरत महिला वाहकांना (कंडक्टर) आता चालक म्हणून काम करण्याची संधी मिळणार आहे. यासाठी पीएमपी प्रशासनाने लवकरच महिलांच्या हाती स्टेअरिंग देण्याचा निर्णय घेतला आहे.या महिलांसाठी पीएमपीने विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाची आखणी केली आहे. ‘इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायव्हिंग ट्रेनिंग अॅण्ड रिसर्च’ संस्थेच्या माध्यमातून एक महिन्याचा विशेष प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

पुणे महानगर परिवहन महामंडळात सध्या एकूण 220 महिला वाहक कार्यरत आहेत. यापैकी 212 महिला वाहक (कंडक्टर) कायमस्वरूपी असून, आठ महिला वाहक या बदली कामगार म्हणून कार्यरत आहेत.स्वारगेट येथील पीएमपी मुख्यालयात एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला महिला कर्मचाऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून, 15 ते 20 महिला वाहकांनी चालक प्रशिक्षणासाठी तयारी दाखवली आहे. प्रशासनाकडून या महिलांना लवकरच प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाणार असून, प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना बसचालक म्हणून संधी दिली जाणार आहे.
पीएमपीने इच्छुक महिला वाहकांना बस चालविण्याचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर या महिलांना सुरुवातीला ‘पुण्यदशम’ बसवर चालक म्हणून नियुक्ती देण्याचा उद्देश आहे. सुरुवातीच्या टप्प्यात 15 ते 20 महिला वाहकांनी चालक होण्यासाठी तयारी दर्शविली आहे.
