हॉटेल, दुकाने, सिनेमागृह आता २४ तास खुली राहणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय, हुक्का पार्लर अन् बिअर बारचं काय?

पुणे : राज्यातील व्यापारी आणि ग्राहकांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात आता दुकाने, हॉटेल्स आणि इतर आस्थापना २४ तास उघडी ठेवता येणार आहेत. महाराष्ट्र सरकारच्या उद्योग विभागाकडून यासंबंधित शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

मद्यपान गृहे, बार, परमिट रूम, हुक्का पार्लर, देशी बार यांसारख्या आस्थापनांना वगळता इतर सर्व आस्थापना, खाद्यगृहं आणि दुकाने आता २४ तास सुरू राहणार आहेत. या निर्णयामुळे राज्यातील व्यापारी व्यवहारांना नवे बळ मिळणार आहे आणि ग्राहकांना दिवस-रात्र सेवा उपलब्ध होणार आहे.
राज्यात आता नाईट लाईफ सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता राज्यातील दुकाने, हॉटेल्स आणि इतर अस्थापना 24 तास उघडी ठेवता येणार आहेत. मद्यपान गृहे, बार परमिट रूम, हुक्का पार्लर, देशी बार वगळून इतर सर्व आस्थापना ,खाद्यगृहं, आणि दुकाने आता 24 तास सुरू ठेवण्याची सूट राज्य सरकारच्या उद्योग विभागातर्फे शासन निर्णय जारी करुन देण्यात आली आहे.

महाराष्ट्र दुकाने आणि आस्थापना (नोकरीचे आणि सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम, २०१७ च्या कलम २ (२) मध्ये “दिवस” याची व्याख्या, मध्यरात्रीपासून सुरु होणारा चोवीस तासांचा कालावधी, अशी नमूद करण्यात आली आहे. तसेच या अधिनियमाच्या कलम १६ (१) (ख) मध्ये आस्थापना आठवड्यातील सर्व दिवस धंदा करण्यास खुल्या ठेवता येतील. मात्र तेथील प्रत्येक कर्मचाऱ्यास आठवड्यातून चोवीस तास सलग विश्रांती मिळेल अशी साप्ताहिक सुटी देण्यात येईल अशी तरतूद केली आहे.

राज्यात २४ तास काय सुरू?
सर्व दुकाने
निवासी हॉटेले
उपाहारगृहे
खाद्यगृहे
थिएटर
सार्वजनिक मनोरंजनाच्या किंवा करमणुकीच्या इतर जागा
इतर आस्थापना
काय बंद राहणार?
मद्यपान गृहे
बार परमिट रूम
हुक्का पार्लर
देशी बार