‘वंशाला दिवा पाहिजे,नवऱ्याचा अट्टाहास , पुण्यात 26 वर्षीय गर्भवतीचा मानसिक छळ ; अखेर उचललं टोकाचं पाऊल…

पुणे : सासरी होणाऱ्या जाचाला कंटाळून विवाहित महिलांच्या आत्महत्येचे प्रमाण पुण्यात दिवसेंदिवस वाढत चालले आहे. अशातच आता पुण्यातील एका 26 वर्षीय गर्भवतीने सासरी होणाऱ्या जाचाला कंटाळून आपलं आयुष्य संपवल आहे.वंशाला दिवा पाहिजे, या नवऱ्याच्या पोकळ अट्टाहासातून गर्भवती महिलेला जीव गमवावा लागला. या प्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात महिलेच्या पतीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, ऋतुजा सागर चुंबळकर, वय २६ वर्ष, रा. हेरंब अपार्टमेंट, बालाजीनगर, अस मृत विवाहितेचे नाव आहे.
तीचा विवाह जानेवारी २०२४ मध्ये पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील सागर चुंबळकर याच्याशी झाला होता. ऋतुजा एका बँकेत काम करत होती, तर सागर हा एका फायनान्स बँकेत कार्यरत आहे. विवाहाच्या साधारण दीड वर्षानंतर ऋतुजा गरोदर राहिली तेव्हा तेव्हा सागर याने “मुलगा झाला पाहिजे, मुलगी झाली तर नांदवणार नाही” अशी धमकी देत तिला सातत्याने मानसिक त्रास दिल्याचा आरोप आहे.पतीकडून वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून ऋतुजा गणेश पेठ येथील माहेरी गेली होती. मात्र तिच्या वडिलांनी तिची समजूत काढून तिला पुन्हा बालाजीनगर येथील सासरी परत पाठवले. परंतु मुलगाच झाला पाहिजे या सागरच्या हट्टापायी ऋतुजा प्रचंड मानसिक तणावाखाली होती. अखेर या त्रासाला कंटाळून तिने टोकाच पाऊल उचललं. या प्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात पती सागर याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
चार महिन्यांची गर्भवती असलेल्या ऋतुजाने विषारी औषध प्राशन केले. तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
