यात्रेवरून परतत असताना दौंडमध्ये मोठा अपघात, ट्रॅव्हल्स पलटी होऊन 11 गंभीर जखमी…!

दौंड : येरमाळ्याच्या येडेश्वरी यात्रेसाठी व देवदर्शनासाठी गेलेल्या पुणे जिल्ह्यातील प्रवाशांच्या बसला दौंड तालुक्यातील पुणे- सोलापूर महामार्गावरील मळद येथे अपघात झाला. यामुळे यामध्ये अनेकजण जखमी झाले आहेत.

अपघात झाल्यानंतर लगेच जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात ११ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. येरमाळा येथील येडेश्वरी देवीचे दर्शन करून तुळजापूरला जाऊन देवदर्शन करून ही खासगी बस परत निघाली होती.

ही बस पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील मळद गावच्या हद्दीत पलटली. पहाटे साडेसहा वाजता ही घटना घडली. ही बस पुणे काशिवाडी येथे निघाली होती. जखमी प्रवाशांना दौंड येथील पिरामीड हॉस्पिटलमध्ये तर ५ प्रवाशांना भिगवण येथे हलविण्यात आले आहे.
पाटस टोलनाक्याच्या पेट्रोलिंग पथकाचे कर्मचारी पोचले असून मदतकार्य करीत आहेत. घटनास्थळी दौंड व कुरकुंभचे पोलिस पोचले आहेत. जखमींना उपचारासाठी खाजगी दवाखान्यात हलविण्यात आले असून हे सर्व प्रवासी पुणे जिल्ह्यातील आहेत.
