मोठी बातमी! कुख्यात गुंड निलेश घायवळ लंडनला पसार, पासपोर्ट मिळवण्यासाठी लढवली शक्कल..

पुणे : पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळवर खून, खुनाच्या प्रयत्नासह दोन डझनाहून अधिक गुन्हे दाखल असताना तो लंडनला पळाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. मात्र गेल्या वीस वर्षापासून गुन्हेगारी कारवाईमध्ये सक्रिय असलेल्या घायवळला पासपोर्ट मिळालाच कसा? हा प्रश्न उपस्थित केला जात असतानाच आता पासपोर्ट मिळवण्यासाठीअहिल्यानगरमधील पत्ता दिल्याचं समोर आलं आहे.

पुण्यात त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे नोंद असल्याने पासपोर्ट मिळण्यामध्ये अडचण येऊ शकते हे ओळखून निलेश घायवळने नगरमधील बनावट पत्त्याचा पासपोर्ट मिळवण्यासाठी उपयोग केला आहे. नगरमधून पासपोर्ट मिळवण्यासाठी घायवळला कोणाचा वरदहस्त लाभलाय हा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे.दरम्यान कोथरूड परिसरात काही दिवसांपूर्वी घडलेल्या गोळीबार प्रकरणात गुंड निलेश घायवळ आणि त्याच्या टोळीतील दहा जणांविरुद्ध पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मकोका अंतर्गत कठोर कारवाई केली आहे. विशेष म्हणजे हा गोळीबार पोलीस ठाण्यापासून अवघ्या शंभर ते दोनशे मीटर अंतरावर झाला होता. या तपासादरम्यान मुख्य आरोपी निलेश घायवळ घटना घडल्यानंतर लंडनला पळून गेल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या कोथरूडमधील घरावर छापा टाकून दोन स्कॉर्पिओ कार आणि दोन दुचाकी जप्त केल्या आहेत.
दरम्यान नगरमधील कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गौरी घुमटानंदी बाजार, कोतवाली, माळीवाडा रोड हा पत्ता घायवळने पासपोर्ट मिळवण्यासाठी वापरल्याचं उघड झालं. त्यामुळे नगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यातील पोलिसांनी निलेश घायवळचा गुन्हेगारी इतिहास न तपासताच पासपोर्टसाठी संमती कशी दिली हा प्रश्न उपस्थित होत आहे. यामुळे नगर पोलीस आता वादात सापडू शकतात. नगरमधून पासपोर्ट मिळवण्यासाठी घायवळला कोणाचा वरदहस्त लाभला आहे असे प्रश्न उपस्थित केले जात आहे.
