पूर्व हवेलीत रस्त्यांना नदीचे स्वरूप; घरात पाणी, शेतातील पिकांचे नुकसान…


लोणी काळभोर : रविवारी रात्री पुणे शहरासह जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. या मुसळधार पावसामुळे रस्त्यांना नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते. अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याच्या घटना घडल्या आहेत. तर ताली फुटल्याने शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

लोणी काळभोरसह पूर्व हवेलीत कोसळलेल्या मुसळधार पावसाने शेती पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरिपाच्या पिकांना मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. शेतातील फुलशेती, ऊस, कोथिंबीर, पालक हे पिके भुईसपाट झाले आहेत. अतिवृष्टीमुळे शेतकरीवर्ग आर्थिक संकटात सापडला असून महसूल विभागाने तात्काळ पिकांचे पंचनामे करून आर्थिक मदत करावी, अशी मागणी पूर्व हवेलीतील शेतकऱ्यांनी केली आहे.

मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसाने रस्त्यावर पाणी साचल्याने लोणी स्टेशन येथील मालधक्क्याकडून येणारी सर्व अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली असून अनेक ठिकाणी दुचाकी व चारचाकी वाहने वाहून गेली आहेत. तर छोट्या मोठ्या अपघातांमुळे वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नागरिकांच्या घरांची पडझड झाली आहे. नागरिकांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. रविवारी मध्यरात्री एक वाजल्यापासून विद्युत पुरवठा खंडित झाला आहे तुटला आहे. लाईट नसल्यामुळे बँकांचे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत.

मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आलेने मुळा-मुठा नदीला पूर आला असून बॅक वॉटरचे पाणी एमआयटी युनिव्हर्सिटी सह इतरत्र पसरले आहे. रामाकृषी रसायन कंपनीकडे जाणारा पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला त्यामुळे राहिंज वस्ती व रामाकृषी कंपनीचा काही काळ संपर्क तुटला होता. तर कदमवाकवस्ती येथील घोरपडे वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने 500 हून अधिक घरांचा संपर्क तुटला आहे. लोणी काळभोर येथील रामदरा पूल जाण्यासाठी बंद केल्याने वड्यावस्त्यांचा संपर्क तुटला. यामुळे हजारो नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

कदमवाकवस्तीत पावसामुळे व्यावसायिकांचे करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे. माझ्या जेके फर्निचर, जेके सेल्स इलेक्ट्रॉनिक्स गोडाऊन, आर वर्ड इंटरियर मॉड्युलर फॅक्टरी या तीन व्यावसायिक दुकानांमध्ये पाणी शिरल्याने 3 कोटींहून अधिक रुपयांच्या साहित्याचे नुकसान झाले आहे. प्रशासनाने लवकर पंचनामे करून नुकसानग्रस्तांना त्वरित मदत जाहीर करावी.
रिजवान खान (उद्योजक, कदमवाकवस्ती)

 

दरवर्षी पाटील वस्ती येथे पुरपरिस्थिती निर्माण होत आहे. ही पूरस्थिती ओढ्यातील अतिक्रमणामुळे झाली आहे. तरी, संबंधित अधिकाऱ्यांनी नकाशाप्रमाणे ओढा करावा. तसेच अतिक्रमण करणाऱ्यांवर कडक कारवाई करून अतिक्रमण हटवावे.-प्रतिक काळभोर (ग्रामस्थ, लोणी काळभोर)

 

मुसळधार पावसात अनेक झाडे, 7 पोल अन फ्लेक्स तारांवर पडले आहेत. त्यामुळे लोणी काळभोर व कदमवाकवस्ती या दोन्ही गावांचा विद्युत पुरवठा तुटला होता. लोणी काळभोर महावितरणच्या शाखा कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून फ्लेक्स व काही ठिकाणची झाडे हटविण्याचे रात्रीपासून काम करीत आहेत. परंतु, अनेक ठिकाणी तारा तुटल्याने विद्युत पुरवठा अद्याप सुरू झालेला नाही. उद्यापर्यंत शेतीसह सर्व विद्युत पुरवठा सुरळीत होईल? तसेच नागरिकांनी कोठेही तार तुटलेली अथवा उघड्यावर पडलेली असेल तर त्वरित विद्युत कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा.
-विक्रांत ओहोळ ( सहाय्यक अभियंता लोणी काळभोर महावितरण शाखा)

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!