वाघोलीत ४ विधी संघर्षित बालक धारदार शस्त्रांसह ताब्यात, गुन्हे शाखा युनिट-6 ची कामगिरी…

लोणी काळभोर : येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीतून धारदार शस्त्रांसह चार विधी संघर्षित बालकांना गुन्हे शाखा युनिट-६ च्या पथकाने ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून ४ लोखंडी कोयते जप्त करण्यात आले असून वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी् (११ सप्टेंबर) रोजी गुन्हे शाखा युनिट-६ चे पथक हे गस्त घालत असताना पोलिस अंमलदार नितीन धाडगे यांना गुप्त माहिती मिळाली की, चार नंबर, भावडी रोड, वाघोली, पुणे या ठिकाणी ४ इसम स्वतःजवळ कोयते घेवून आहेत. त्यानुसार भावडी रोड परिसरात सापळा रचून संशयितांना ताब्यात घेण्यात आले.
यावेळी १७ वर्षे वयाचे चार विधी संघर्षित बालक ही शस्त्रांसह आढळली असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यातील एका बालकावर यापूर्वी गंभीर दुखापतीचा गुन्हाही दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक वाहीद पठाण यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक राकेश कदम, मदन कांबळे, गिरीश नाणेकर, प्रशांत कापुरे, सारंग दळे, निलेश साळवे, सुहास तांबेकर, ऋषिकेश ताकवणे, सचिन पवार, ऋषिकेश व्यवहारे, नितीन धाडगे व बाळासाहेब तनपुरे यांनी केली आहे.