माळी समाजाबद्दल लक्ष्मण हाकेंचे वादग्रस्त वक्तव्य, व्हिडिओमुळे माळी समाजात संताप, नेमकं काय म्हणाले?

मुंबई : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा एका व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. त्यात त्यांनी माळी समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याचा दावा करण्यात येत आहे. या वक्तव्यावरून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

या घटनेमुळे राजकीय व सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, स्वतः लक्ष्मण हाके यांनी या व्हिडिओबाबत स्पष्टीकरण दिले असून तो व्हिडिओ एडिटेड असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
व्हायरल झालेल्या या व्हिडिओत लक्ष्मण हाके बोलताना दिसत आहेत. त्यात ते म्हणतात, माळ्यांचं दुखणं एक आहे, ओबीसींचं नेतृत्व माळ्यांकडून धनगरांकडे चाललं आहे. ही त्यांची पोटशूळ. या वक्तव्यावरून माळी समाजात अस्वस्थता पसरली असून हाके यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. मात्र हा व्हिडिओ खरा की खोटा यावर अजूनही संभ्रम कायम आहे.

व्हिडिओमध्ये पुढील काही भाग नीट ऐकू येत नसल्याने त्यातील आशय अधिक वादग्रस्त असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या व्हिडिओबाबत प्रतिक्रिया देताना लक्ष्मण हाके म्हणाले की, हा व्हिडिओ माझाच आहे, पण त्यातील आवाज माझा नाही.
दरम्यान, माळी समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करण्याचा प्रश्नच येत नाही. ओबीसी जातींमध्ये फुट पाडण्यासाठी आणि समाजात मतभेद निर्माण करण्यासाठी हा प्रकार करण्यात आला आहे. मी काही वेडा नाही की असं वक्तव्य करीन. हाके यांनी पुढे सांगितले की, जरांगे यांच्याविरोधात आपण आंदोलन सुरू केले असतानाच हा व्हिडिओ समोर येतोय. त्यामुळे ही राजकीय कटकारस्थानाची खेळी असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
दरम्यान, या व्हिडिओवर ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, सोशल मीडियावर आपण हा व्हिडिओ पाहिला आहे. माळी समाजाने नुकताच हाके यांचा सत्कार करून त्यांना सन्मान दिला. त्याच नेत्यांच्या तोंडून असे वक्तव्य येणे दुर्दैवी आहे. त्यांनी खरंच बोलले की नाही, हे महत्त्वाचे नाही. पण व्हिडिओत तरी ते बोलताना दिसत आहेत. त्यामुळे आता त्यावर हाके यांनीच स्पष्ट उत्तर द्यावे.