हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती ; पुण्यात सासरच्या छळाला कंटाळून आयटी अभियंत्याच्या पत्नीने आयुष्य संपवलं…

पुणे : पुण्यातील हगवणे प्रकरणानंतर हुंडाबळीच्या घटना काही थांबताना दिसत नाहीत. अशीच एक हुंडाबळीची घटना पुण्यातील वाकड परिसरात घडली आहे. 26 वर्षीय विवाहित महिलेने नवरा आणि सासरच्या कुटुंबाच्या जाचाला कंटाळून आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दिव्या हर्षल शिखरे (वय 26) असं मृत विवाहित महिलेचे नाव आहे. शेतकरी कुटुंबातील असणाऱ्या दिव्याचा विवाह तीन वर्षांपूर्वी हर्षल सूर्यवंशी या आयटी अभियंत्यासोबत झाला होता.लग्न ठरवताना दिव्याच्या सासरच्या मंडळींनी तिच्या वडिलांकडे 40 तोळे सोन्याची मागणी केली होती. त्यानुसार पाच लाख रुपये खर्च करून आधी साखरपुडा झाला. त्यानंतर जवळपास 20 लाख रुपये खर्च करत मोठ्या थाटामाटात भाऊसाहेब खैरनार यांनी दिव्याचे आणि हर्षलचे लग्न लावून दिलं. मात्र त्यानंतरही होणाऱ्या त्रासाला कंटाळून अखेर दिव्याने आपला आयुष्य संपवलं.आधी दिव्याला मारहाण करून नंतर त्यांनीच फासावर लटकवलं असल्याचं दिव्याच्या माहेरचं म्हणणं आहे. तर दिव्याच्या सासरच्या मंडळीवर कठोर कारवाई करून आमच्या मुलीला न्याय द्या अशी आर्त हाक दिव्याच्या आई वडिलांनी दिली आहे.
दरम्यान वाकड पोलीसांनी या प्रकरणी दिव्याचा पती आरोपी हर्षल सूर्यवंशी आणि सासरे शांताराम सूर्यवंशीला ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणात आणखी काही जणांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.
