खासदार सुप्रिया सुळेंनीं पुण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे केली ‘ही ‘मागणी

पुणे : पुणे शहरासह परिसरातील लोकसंख्या आणि प्रलंबित खटल्यांची वाढती संख्या लक्षात घेता पुणे खंडपीठाची गरज असल्याची मागणीराष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहुन केली आहे. पुणेकरांची अनेक वर्षांपासूनची मागणी असलेल्या पुणे उच्च न्यायालयाच्या खंडपीठाला आता आणखी जोर मिळाला आहे.
पुणे जिल्ह्याच्या इंदापूरसारख्या तालुक्यातील दूर अंतरावरील गावाचा विचार केला तर मुंबईपासून ते अंतर तब्बल तीनशे ते साडेतीनशे किलोमीटर अंतरावर आहे. याचा विचार करता कोल्हापूरप्रमाणे पुण्यातही उच्च न्यायालयाचे खंडपीठ होणे अत्यावश्यक आहे, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. त्यामुळे पुण्यात खंडपीठ स्थापन करण्यात यावे, असे सुप्रिया सुळे यांनी पत्रात नमूद केले आहे.
कोल्हापूर खंडपीठाला नुकतीच मान्यता मिळाल्यानंतर, पुणे बार असोसिएशनने पुन्हा एकदा आपली मागणी उचलून धरली आहे. याच पार्श्वभूमीवर, खासदार सुप्रिया सुळे यांनीही पुण्यात खंडपीठ स्थापन करण्यासाठी राज्य सरकारकडे पत्र पाठवले आहे. या पत्रामुळे या मागणीला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. सरकारला यावर सकारात्मक विचार करावा लागेल असे मानले जात आहे.