पुणे जिल्ह्यात डाळिंबचोर पुन्हा सक्रिय! शिंदवणेत अज्ञाताने दीड लाखांचे डाळिंब चोरले….

उरुळी कांचन : उरुळी कांचन नजीक असलेल्या शिंदवणे (ता. हवेली) येथील काढणीस आलेल्या भगवा जातीच्या डाळिंबाची रातोरात अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे.

हि घटना गुरुवारी (ता.२४) ते शनिवारी (ता. २६) सकाळी हवेली तालुक्यातील शिंदवणे येथील प्रगतशील शेतकरी गुरुनाथ मचाले यांच्या शेतात घडली आहे. ऐवजाच्या चोरीसह आता डाळिंबाची चोरी होत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मचाले यांची शिंदवणे ग्रामपंचायत हद्दीत शेती आहे. या शेतात त्यांची स्वतःची अडीच एकर डाळिंब बाग आहे. यातील 250 झाडांवरील डाळिंब पिक काढणीस आले आहे. तर बाकीच्या झाडावरील पिक हे लहान आहे.

गुरुवारी (ता. २४) दुपारी डाळिंब पिकावर फवारणी केली व ते पिक पाहून घरी निघून गेले होते. त्यांनी फवारणी केली असल्याने त्यांना झाडांवरील काही मोठी डाळिंब विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे काढणी योग्य असलेले डाळिंब पिक पुढील दोन तीन दिवसांत डाळिंब विक्रीसाठी पाठवले जाणार होते.
शनिवारी (ता. २६) नेहमीप्रमाणे मचाले शेतातील डाळिंब बागेत पाहणी करीत असताना काही झाडांवर डाळिंब पिक कमी झालेले दिसून आले. त्यांनी बागेत फिरून पाहणी केली असता तब्बल एक ते दीड टन डाळिंब कमी असल्याचे दिसून आले. यावरून डाळींबावर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारल्याचे लक्षात आले.
दरम्यान, डाळिंबाला बाजारात प्रती किलो १५० रुपयांपासून ते ४०० रुपयांपर्यत असा चांगला भाव मिळत आहे. हीच नामी संधी चोरट्यांनी साधून काढणीस आलेले १ ते दीड टन डाळिंब रातोरात चोरून नेले आहे. त्यामुळे शेतकरी गुरुनाथ मचाले यांचे मोठे नुकसान झाले आहे.
दरम्यान, मचाले यांनी यावर्षी अत्यंत कष्टाने डाळिंबाचे पीक जोपासले होते. बागेसाठी त्यांनी एक लाख रुपयांचा खर्च केला होता. डाळिंबाला कधी चांगला तर कधी पडेल दर मिळत असतो. कधी उत्पादन चांगले येते तर कधी मर, तेल्या यांसारख्या रोगाला डाळिंब पिकाचे नुकसान होते. तरीही शेतकऱ्यांनी चांगल्या दर्जाचे डाळिंबाचे पीक घेण्यास प्राधान्य देतात. मागील काही दिवसांपासून हातातोंडाशी आलेल्या पिकांची चोरी होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.