पुण्यातील बांधकाम व्यवसायिकाच्या घरी सशस्त्र दरोडा ; हातपाय बांधले अन….

पुणे : पिंपरी चिंचवड शहरातील बांधकाम व्यवसायाच्या घरी चार ते पाच दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. बांधकाम व्यवसायिकाचे हातपाय बांधून दरोडेखोरांनी रोकड सह लाखोचा किमती ऐवज लंपास केला आहे.या प्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रभान छोटूराम अग्रवाल असं बांधकाम व्यावसायिकाचं नाव आहे. घटनेच्यावेळी रात्री ते घरात एकटेच असताना दरोडेखरांनी घरात घुसून दरोडा टाकला. चंद्रभान यांचे हातपाय बांधून त्यांना एका खोलीत बंद केलं. हा सगळा प्रकार चालू असताना त्यांनी गॅलरीत जाऊन दरवाजा बाहेरून बंद केला. त्यांनी गॅलरीत उभे राहून आसपासच्या लोकांना मदतीसाठी हाका मारल्या.यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला.रात्री उशिरापर्यंत अग्रवाल यांच्या बंगल्यासमोर पोलिसांचा ताफा उभा होता. तसेच शेकडो नागरिकांनी गर्दी केली होती.
दरम्यान या घटनेत नेमकी किती रक्कम किंवा ऐवज चोरीला गेला? दरोडेखोर कोण होते? हा सर्व दरोडा कसा पडला? यात कुणाचा सहभाग होता का? याची माहिती अद्याप समोर आली नाही. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलीस अधिक तपास करत आहेत.