सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ८व्या वेतन आयोगामुळे पगारात ‘इतक्या’ टक्क्यांनी होणार वाढ..

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ८व्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू झाल्यानंतर कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पगारात तसेच पेन्शनमध्ये ३० ते ३५ टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे.

या वेतनवाढीमुळे केवळ कर्मचारीच नाही तर देशातील ग्राहक खर्चातही मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ८वा वेतन आयोग जानेवारी २०२६ पासून लागू होण्याची शक्यता वर्तवली जात असली, तरी सध्या सेवाशर्ती आणि आयोगातील सदस्यांची नियुक्ती सरकारकडून झालेली नाही.
त्यामुळे वेळेवर अंमलबजावणी होणार की नाही, याबाबत साशंकता आहे. अहवालानुसार, ७व्या वेतन आयोगात केवळ १४ टक्क्यांची माफक वाढ झाली होती. त्यानुसार, 8व्या वेतन आयोगात १. ८३ ते २.४६ चा फिटमेंट फॅक्टर ठेवण्याची शक्यता आहे.

म्हणजेच, सध्याच्या मूळ वेतनात या गुणकाने वाढ करून नवीन वेतन निश्चित होणार आहे. यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना लक्षणीय फायदा होणार असून, पगारात प्रत्यक्ष वाढ ३० ते ३४ टक्क्यांपर्यंत जाऊ शकते.
दरम्यान, सरकारकडून अद्याप आयोगासाठी समिती किंवा सदस्यांची घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे जानेवारी २०२६ पासून शिफारशी लागू होण्याची शक्यता कमी आहे. ७व्या वेतन आयोगालाही लागू होण्यासाठी १८-२४ महिने लागले होते.